जळगाव : कारमधून आलेल्या आठ जणांनी घरात घुसून मारहाण केली व ५६ हजार रुपये रोख, सीसीटीव्ही कॅमेराचा डिव्हीआर, इतर साहित्य लुटून नेण्यासह कोऱ्या धनादेशावर जबरदस्तीने सही करायला लावल्याची घटना घडल्याबाबत मनीष रमेश कथुरिया (रा.मेहरुण तलाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीत विकास मनीलाल परिहार, संजय मनिलाल परिहार व इतर सहा जणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
कथुरिया यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जानुसार ही घटना ४ जानेवारी रोजी सकाळी पावणे आठ वाजता घडली. विकास परिहार याने बेदम मारहाण केली व कॉलर पकडून इमारतीतील पहिल्या मजल्यावरील कार्यालयात घेऊन गेले. तेथे सर्वांनी घेरुन पुन्हा मारहाण केली. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर, डिवाईस,लेन हब, फोनची वायर काढून टाकली. डीव्हीआर त्यांनी आणलेल्या कारमध्ये (क्र.एम.एच.१९-७८१) ठेवले. आरडाओरड करायला सुरुवात केल्याने तोंड दाबून ठेवले. कपाटातील ५६ हजार रुपये रोख, धनादेश, काढून घेत कोऱ्या धनादेशावर जबरदस्तीने सही घेतली. मोबाईल हिसकावून घेतला, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, या घटनेनंतर कथुरिया यांनी स्वखर्चाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
कोट...
तक्रारदार व संबंधित व्यक्ती यांच्यात संस्थेवरुन वाद आहे. घटनेच्या दिवसाचे मोबाईल सीडीआर मागविण्यात आलेले आहेत. सर्व पातळीवर चौकशी सुरु आहे. तपासात तथ्य आढळले तर गुन्हा दाखल केला जाईल.
-अतुल वंजारी, तपासाधिकारी