-नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली
-डिसेंबर महिन्यात आता अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील,
जळगाव - गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्र्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतुवर होताना दिसून येत आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली असली, तरी मात्र थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र, या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात किमान तापमानात ७ अंशाची घट झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायबच झाली आहे. साधारणपणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात होत असते. त्यातच यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीला लवकर सुरुवात झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते; मात्र ८ नोव्हेंबरपासून थंडी गायबच झाली आहे. बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना ब्रेक लावला आहे. यामुळे यंदा थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.
हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ
जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. जागतिक हवामान बदलाचा परिणाम जिल्ह्यावरदेखील झाला आहे. किमान तापमानाची सरासरी वाढत असल्याने जिल्ह्यातील रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा, गहू, मक्याच्या वाढीसह उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.