लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ''आश्रय माझे घर'' या प्रकल्पाच्या माध्यमातून मतिमंद बालकांचे संगोपन करण्याचे महत्त्वाचे काम होत असून या बालकांना आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावे अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा नियोजनमधून या परिसरासाठी ट्रान्सफॉर्मर व ओपन जिमसह रोटरीच्या सोलर प्रणालीच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.
कार्यक्रमास केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, डॉ. प्रताप जाधव, उद्योगपती सुशील असोपा, भावेश शहा, संजय शहा, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, रोटरी क्लबच्या माजी गव्हर्नर अपर्णा मकासरे, हितेश मोतीरामानी, आश्रय माझे घरचे सर्व सदस्य यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
आईच्या नावाने दोन लाखाची देणगी जाहीर
गुलाबराव पाटील यांनी आपल्या आईच्या नावाने आश्रयला दोन लाख एक रुपयांची मदत यावेळी घोषित केली. ‘आश्रय माझे घर’ला सातत्याने नि:स्वार्थ वैद्यकीय सेवा देणारे डॉ. सुशील गुजर, डॉ. राहुल महाजन, डॉ. नीलम महाजन, डॉ. महेश बिर्ला व त्यांचे सहकारी यांचा गौरव करण्यात आला. कोरोना काळात विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. रितेश पाटील व सेवारथ परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रताप जाधव, आभार प्रदर्शन रेखा पाटील यांनी तर सूत्रसंचालन संगीता अट्रावलकर यांनी केले.