लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती ती सरपंचपदाची निवड बुधवारी ममुराबाद व परिसरातील डिकसाई येथे होणार आहे. दोन्ही ठिकाणी मोठी उत्सुकता निर्माण झाली असून बिनविरोध निवडीसाठी सरपंचपदाच्या दावेदारांसह त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
ममुराबाद येथील सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असून माजी सरपंच हेमंत गोविंद चौधरी त्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. चौधरी यांनी यापूर्वी २००३मध्येही काहीकाळ ममुराबाद ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले होते. सलग सहाव्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकल्यानंतर नशिबाने त्यांच्याकडे यंदाही सरपंचपद चालून आले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेच्या सरपंचपदासाठी शैलेश यशवंत पाटील, अंजनाबाई सुरेश शिंदे व अन्य काही सदस्यसुद्धा दावेदार आहेत. त्यांना काही वर्षे सरपंचपद वाटून दिल्यास हेमंत चौधरी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर होऊ शकेल. त्यादृष्टीने संबंधितांच्या वाटाघाटी यशस्वी होतात किंवा नाही त्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सरपंचपदी कोण विराजमान होतो त्याची उत्कंठा सर्वांना लागली आहे.
डिकसाईत तीन महिला दावेदार
डिकसाई ग्रामपंचायतीची निवडणूक निवृत्त फौैजदाराच्या प्रयत्नांमुळे बिनविरोध झाली होती. तसाच प्रयत्न सरपंचपदाच्या निवडीसाठीही सुरू आहे. सर्वसाधारण महिला जागेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी सुनंदा तुळशीराम सूर्यवंशी, अहिल्या संतोष चव्हाण आणि चित्रा कैलास भिल या तीन महिला दावेदार आहेत. अनेकांनी सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केलीसुद्धा आहे. तिन्ही महिलांपैकी नेमकी कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते, त्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.