लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भुसावळ रेल्वेचे सिनियर डिओएमना टीटीईने (तिकीट परीक्षक) बी कॅबिनमधून ए कॅबिनमध्ये जाण्यास सांगितल्यामुळे डिओएमना राग आला आणि दोघांमध्ये गाडीतच वादाची ठिणगी पडली. चिडलेल्या डिओएमनी टीटीईवर मद्यप्राशनाचा आरोप करत त्यांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली, मात्र त्यात टीटीईने मद्यप्राशन केल्याचे सिध्द झालेच नाही. मानापमानाच्या नाट्यामुळे शुक्रवारी रात्री जळगाव स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला तब्बल १४ मिनिटे विलंब झाला.
भुसावळ विभागाचे सिनियर डिओएम रामनिवास मीना शुक्रवारी राजधानी एक्सप्रेसने (क्र.२२२२१)ने नाशिकरोड येथून बोगी क्र. एच.१ ने बी कॅबिनमधून प्रवास करीत होते. तिकिट निरीक्षक (टीटीई) निखील राठोड यांनी मीना यांना ए कॅबिनमध्ये जाण्यास विनंती केली. त्यावर राठोड यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करत मीना यांनी भुसावळ कंट्रोल रुमशी संपर्क करुन जळगावाला ब्रेथ ॲनालायझर मागवले.
अन्य टीटीई धावले मदतीलावरिष्ठ अधिकारी असल्याने स्टेशन मास्तरकडून सिग्नल दिला जात नव्हता. टीटीई ऑनड्युटी आहे, आणि रिपोर्टही निगेटिव्ह आहे. तुम्ही विभागीय कार्यवाही करु शकता, गाडी रवाना करावी ही आरपीएफची विनंतीही धुडकावून लावण्यात आली. या प्रकाराबद्दल गाडीतील अन्य टीसींनी संताप व्यक्त करुन राठोड यांना गाडीतून उतरविण्यास विरोध केला.
दरम्यान राठोड यांना अन्य कोचमध्ये लपविण्यात आले. मीना यांनी आरपीएफकडे लेखी रिपोर्ट दिला. त्यानंतर ९ वाजून १६ मिनिटांनी गाडी रवाना झाली. दरम्यान, या प्रकारावर आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.
डिओएम यांचा बोलण्यास नकारया वादाच्या पार्श्वभूमीवर सिनियर डिओएम रामनिवास मीना यांच्याशी ‘लोकमत’ ने संपर्क साधला असता, गाडीतील वाद फार मोठा नव्हता. ब्रेथ ॲनालयाझर मशिनद्वारे संबंधित टीटीईची तपासणी करण्यात आली होती इतकेच बोलले.
का झाला वाद?टीटीई राठोड यांनी मीना यांना ओळखले नाही. ते ज्या कोचमध्ये होते, तेथे दरवाजा बंद करण्यास अडचणी येत होत्या, शिवाय अस्वच्छता होती व साफसफाई केली जाणार होती. अन्य कोचमध्ये जाण्यास सांगितल्यामुळे मीना यांना त्याचा राग आला.