(कुजबूज)
जळगाव - महापालिकेत शिवसेनेने ऐतिहासिक सत्तांतर घडवून महापालिकेत सत्ता आणली. यामध्ये शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी खुश असले तरी मात्र सेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा इगो हर्ट झाल्यामुळे सेनेतील अंतर्गत घडामोडी वाढल्या आहेत. जळगावच्या सत्तांतरात विनायक राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, तर दुसरीकडे संजय राऊत, संजय सावंत यांना दूर ठेवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी नेत्यांचा गटात विभागून गेले आहेत. सेनेत नव्याने दाखल झालेले नगरसेवक व एकनाथ शिंदे, विनायक राऊतांना आपले नेते मानत आहेत, तर आधीचे नगरसेवक व पदाधिकारी संजय राऊत, संजय सावंत यांना नेते मानत आहेत. तसेच पक्षाचे हे नेत्यांचे दोन्ही गट आपल्या आपल्या गटातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनाच मदत करताना दिसून येत आहेत. इतर गटाच्या नगरसेवकांना डावलण्याचा प्रयत्न सध्या सेनेत होताना दिसून येत आहे.