जळगाव विमानतळ : मुंबईच्या नियमित विमानसेवेची मात्र प्रतिक्षाच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या कोरोनाच्या कठीण काळातही प्रवाशांच्या सुविधेसाठी जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू असून, आतापर्यंत ८ हजार ४४४ प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे. मात्र, सर्वाधिक प्रवासीसंख्या असलेल्या मुंबई मार्गावर दोनच दिवस सेवा सुरू असून, दररोज ही सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतर, तेव्हा पासून जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अहमदाबादची विमानसेवा चार दिवस, तर मुंबईची विमानसेवा आठवड्यातून दोनच दिवस सुरू आहे. यात दर बुधवार, गुरुवार, शनिवार व रविवारी अहमदाबादची सेवा, तर बुधवारी व रविवारी मुंबईची विमानसेवा सुरू आहे. असे असले तरी कोरोना काळातही प्रवाशांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनातर्फे अत्यंत कडक उपाययोजना राबविण्यात आल्या असून, विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल गनद्वारे तापमानाची मोजणी करूनच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. विशेष म्हणजे शासनाच्या सूचनेनुसार अहमदाबादवरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे स्वतंत्र आरोग्यपथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाच्या सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रवाशांना वेळोवेळी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
इन्फो :
...तर प्रवाशांची संख्या आणखी वाढणार
सध्या कोरोनामुळे राज्य शासनाने मुंबई विमानतळावरील अनेक उड्डाणांवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे जळगाव ते मुंबईची विमानसेवा आठवड्यातून दोनच दिवस सुरू आहे. जर मुंबईची विमानसेवा नियमित केली तर प्रवाशांची संख्या आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. कारण, मुंबई मार्गावर जाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने, सध्या आठवड्यातून दोन दिवस सेवा असतानाही, या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
इन्फो :
पुणे व इंदूर विमानसेवेच्या हालचालीही गतिमान
जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा झाल्यामुळे रात्रीदेखील विमान उतरणे शक्य झाले आहे. त्यामुळे जळगाव विमानतळावरून पुणे व इंदूर विमानसेवा सुरू करण्याबाबत गेल्या महिन्यात खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय उड्डाणमंत्री हरिदीपसिंग पुरी यांची भेट घेतली होती. त्यांनी ही सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही सेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.