लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोहाडी शिवारातील शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाचे काही काम अद्यापही प्रलंबित आहे. १ एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना शासनाकडून संबंधित ठेकदाराला दिल्याने कामाची गती वाढविण्यात आली आहे. दरम्यान, कोविड केअर सेंटर म्हणून जागेची अडचण समोर येत असताना, हा एक पर्याय म्हणून या रुग्णालयाकडे बघितले जात आहे. मात्र, आतापर्यंत त्या दृष्टीने कामाला गती देण्यात आली नव्हती.
२०१९ पासून मोहाडी शिवारात या महिला रुग्णालयाचे काम सुरू आहे. दोन वर्षांची मुदत संपल्यानंतर, वाढीव एक वर्षाची मुदत घेण्यात आली होती. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे मजूर नसणे, मध्यंतरी निधीची अडचण अशा अनेक बाबींमुळे काम रखडले होते व संथ गतीने सुरू होते. या फेब्रुवारीत वाढीव मुदतही संपल्यानंतर आताही रुग्णालयातील एका इमारतीचे काम बाकी आहे. ए व बी विंगचे काम बऱ्यापैकी झाले असून, मंगळवारी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू होते. प्लॅस्टरचे काम सुरू असून, सी विंगचे बरेच काम बाकी असल्याचे चित्र आहे. मात्र, ए व बी विंगचे काम झाले आहे.
डीसीएचसी किंवा सीसीसी म्हणून वापर शक्य
गेल्या वर्षभरापासून शहरात दोन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असावे, असा सूर वारंवार समोर आला होता. त्या दृष्टीने हे रुग्णालय एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असेही मत अनेक तज्ज्ञांकडून समोर आल होते. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर पाहणीही झाली होती. मात्र, रुग्णालयाचे काम पूर्ण न झाल्याने हा विचारही मागे पडला आहे. आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.