- अमित महाबळ जळगाव : जगातील सर्वांत लहान धर्म म्हणून ओळख असलेल्या पारशी बांधवांची आठ कुटुंबे जळगाव शहरात राहत असून, जिल्ह्याच्या विकासात या समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या नवीन वर्षाला (नवरोज) सुरुवात झाली आहे. नवीन पिढी व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत असल्याने या समाजाची जिल्ह्यातील लोकसंख्या कमी होत चालली आहे.
एरच जलगाववाला यांनी सांगितले, की पूर्वी जळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरांत मिळून १०० ते १५० पारशी कुटुंबे राहायची. त्यांच्यातील बहुसंख्य जण हे रेल्वेत नोकरीला होते. कापूस व्यवसाय, ट्रान्सपोर्ट व गॅरेज या व्यवसायातही ते स्थिरावले होते. रेल्वेत ७० टक्के वरिष्ठ अधिकारी पारशी होते. त्यातील अनेक जण भुसावळला स्थायिक झाले होते. जगप्रसिद्ध छायाचित्रकार व चित्रकार केकी मूस हे चाळीसगावचे होते. मात्र, आज जळगाव शहरात केवळ आठ कुटुंबे राहिली आहेत. अमळनेर व भुसावळमध्ये हाताच्या बोटावर मोजता एवढीच घरे आहेत.
भुसावळात टॉवर ऑफ सायलेन्सच्या स्मृतीपारशी समाजात अग्निपूजन आहे. जळगावला जवळचे अग्निमंदिर (अग्यारी) अकोला, इगतपुरी, बडनेरा, बारडोली या ठिकाणी आहे. झोराष्ट्रीयन ट्रस्टच्या माध्यमातून जळगावात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. समाजाचा गिरणा टाकीसमोर झोराष्ट्रीयन हॉल आहे. भुसावळमध्ये टॉवर ऑफ सायलेन्स (स्मशानभूमी) होते. ते आता बंद आहे. आता यासाठी सुरत किंवा मुंबईला जावे लागते.
वायझेड १३९२ सुरूपारशी बांधवांच्या कॅलेंडरमध्ये ३६५ दिवस असून, पहिले ११ महिने ३० दिवसांचे व शेवटचा १२ वा महिना ३५ दिवसांचा असतो. शेवटच्या महिन्यातील शेवटच्या पाच दिवसांत श्राद्धविधीचे असतात. पतेती होऊन नवरोजला सुरुवात झाली असून, सहाव्या दिवशी धर्मगुरू झोरास्टर यांचा जन्मदिवस एकत्रितपणे साजरा केला जाणार आहे.
जळगाव शहरातील पारशी कुटुंबेजलगाववाला, अडाजानिया, पाजनिगरा, दरबारी, मिस्त्री, पेसुना, फणीबंदा, दारुवाला कुटुंबे आहेत. लोकसंख्या सुमारे ५० आहे. व्यवसाय, शेती, शिक्षण, गॅरेज, ड्रायव्हिंग स्कूल आदी क्षेत्रात ही कुटुंबे आहेत.
पहिली बस पारशी व्यक्तीचीहैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आल्यानंतर जळगावहून अजिंठ्याला जाणारी पहिली प्रवासी बस जहाँगीर ताडीवाला (जलगाववाला) या पारशी व्यावसायिकाची होती. त्यांची मोटार सर्व्हिस होती. १०० गाड्या होत्या, २०० ते ३०० कर्मचारी काम करायचे. जळगाव जिल्ह्यात त्यांची बससेवा होती. जळगाव शहरात त्यांची शेवटची बस १९५२ मध्ये टॉवर ते एम. जे. कॉलेज मार्गावर धावली. त्यानंतर त्यांनी हा व्यवसाय बंद केला. फारुक फणीबंदा खर्ची (एरंडोल) येथील सरपंच होते. नवशेर भरुचा तीन वेळा कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने जळगावमधून संसदेत निवडून गेले होते. त्यांचे मतदानाचे चिन्ह झोपडी असायचे, अशीही माहिती एरच जलगाववाला यांनी दिली.