जळगाव : समोर चालणाऱ्या कारला दुसरी कार आडवी लावून नाना नथ्थू पाटील (६१,रा.एरंडोल) या चालकाची छाती व पायावर बसून साखर व्यापाऱ्याची आठ लाखाच्या रोकडसह कार लांबविल्याची घटना रविवारी मध्यरात्री वावडदा-म्हसावद रस्त्यावरील बिलवाडी फाट्यानजीक घडली. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एरंडोल येथील साखर व्यापारी मनोज गोकुळदास मानधुने यांनी साखर विक्री केलेल्या शेंदूर्णी, सिल्लोड, सोयगाव परिसरातील दुकानदारांकडे नाना पाटील हे रविवारी सकाळी कारने (क्र.एम.एच.०२ ईआर ५३८२) पेमेंट घेण्यासाठी गेले होते. दिवसभरात ७ लाख ९० हजार रुपये जमा करुन रात्री घरी परत येत असताना १ वाजता बिलवाडी फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या कारमधील चौघांनी पाटील यांच्या कारच्या पुढे आडवी लावून पाटील यांना बाहेर काढले. यावेळी एक जण छातीवर बसला तर दुसरा पायावर बसला. इतर दोन जण पाटील यांच्या कारमध्ये बसले. नंतर छातीवर व पायावर बसलेले दोघेही पाटील यांच्या कारमध्ये बसून दोघं कार घेऊन म्हसावदच्या दिशेने पळून गेले.