जळगाव आगार : महामंडळातर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे मनपा आरोग्य विभागा मार्फत शनिवारी व रविवारी एस.टी. कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये चाचणी करण्यात आलेल्या ४५० पैकी आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जळगाव आगारात शनिवार व रविवार असे दोन दिवस सकाळी १० ते दुपारी २ या वेळात ही चाचणी करण्यात आली. यात पहिल्या दिवशी शनिवारी २७५ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या मध्ये तीन वाहक व एक चालक असे चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर रविवारी १७५ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात पुन्हा दोन चालक, एक वाहक व एक लिपिक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यांना शहरातील विविध कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इन्फो :
आता लस तरी लवकर द्या
गेल्या वर्षभरा पासून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याबाबत स्थानिक प्रशासनातर्फे वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. याची दखल घेऊन, नुकत्याच कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या. मात्र,आता कोरोनाच्या भयावह परिस्थितीत महामंडळाचे कर्मचारी काम करत असल्याने त्यांना आता तरी तातडीने कोरोना लस देण्याची मागणी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.