बोदवड : तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिराजवळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील भाविकांचे वाहन उलटले. यात आठ जण किरकोळ जखमी झाले. जखमींना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णल्यात हलविले. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील १५ भाविक संत मुक्ताबाईच्या दर्शनासाठी यात्रेनिमित्त आले होते. शिरसाळा येथील मारूतीच्या दर्शनालाही गेले असता त्यांचे चार चाकी वाहन हे उतारावर लावले होते. यावेळी या वाहनात महिला व भाविकांसह लहान मुले बसलेली असताना सदर वाहन खड्डयात उतरले व पलटी झाले. त्यामुळे या आठ जणांना इजा पोहचली. याचवेळी एकनाथराव खडसे हे मारुतीचे दर्शन घेऊन बोदवड कडे येत असताना त्यांनी येथे थांबत कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले व स्वत:च्या वाहनात बसवत बोदवडला खासगी रुग्णालयात हलविले. त्यांच्या सोबत बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, स्वीय सहायक योगेश कोलते, बोदवडचे नगरसेवक अनिल खंडेलवाल, भाजप तालुका अध्यक्ष विनोद कोळी, बाजार समिती संचालक रामदास पाटील, रवी खेवलकर, सचिन राजपूत, विक्रम वरकड, आंनद पाटील, जीवन राणे, दीपक वाणी यांनी मदत केली.
भाविकांचे वाहन उलटून आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 8:16 PM