जळगाव : मालवाहतूक वाहनातून आलेल्या आठ चोरट्यांनी कानळदा रस्त्यावरील श्रीनाथजी सॉ मिल फोडून सुमारे लाख रुपयांची वायर बंडल, अॅम्प्लिफायर, मिक्सर तसेच स्पीकर चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश्वर कॉलनी येथील रहिवासी समीर नटवरलाल शाह यांची कानळदा रस्त्यावर श्रीनाथजी सॉ मिल आहे़ त्याच ठिकाणी त्यांचे ऑफिस व साऊंड सिस्टीमचे दुकानही आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शाह हे सॉ मिल बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सॉ मिलचे कुलूप तोडून इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले़ शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास समीर शाह यांचे बंधू सुधीर हे सॉ मिल उघडण्यासाठी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. हा प्रकार त्यांनी लागलीच भाऊ समीर यांना सांगितले. सॉ मिलमध्ये पाहणी केली असता, सुमारे लाख रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.
मूर्तिकारांना दिसले चोरटे
सॉ मिलच्या शेजारी काही मूर्तिकार वास्तव्यास आहेत़ मध्यरात्री १.३० ते २.३० वाजेच्या सुमारास मालवाहतूक वाहनातून आठ व्यक्ती उतरले़ त्यांनी काही वेळ सॉ मिलच्या बाहेर गोंधळ घातला. नंतर चोरी करून वाहनातून पसार झाले. त्यांच्या हातात शस्त्र असल्यामुळे भीतीपोटी घराबाहेर न निघाल्याचे मूर्तिकार यांनी समीर शाह यांना सांगितले. त्यानंतर शाह यांनी भावासोबत शहर पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण प्रकार सांगितला. शेवटी त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच पोलीस दलातील श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली. तसेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.