जळगाव : आपल्या आजारपणाबाबत शंका उपस्थित करणारे मंत्री गिरीश महाजन यांनी माझे चॅलेंज स्विकारावे व त्यानुसार वेळ, तारीख कळवावी तसेच त्यांच्या आरोपामुळे आपली मानहानी झाली असून त्यासाठी त्यांना वकिलांमार्फत एक रुपया अब्रुनुकसानीची नोटीस बजावल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री विरोधक असूनही त्यांनी एअरॲम्बुलन्स पाठविली. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच ह्दय बंद पडले. तेथे सर्व यंत्रणा असल्याने काही सेंकदात शॉक देऊन ह्दय सुरु केले. मरणाच्या दारातून आपण परत आलो. असे असताना महाजन यांच्याकडून आपल्या आजारपणावर शंका घेण्यात आली. आता रुग्णालयाचे प्रमाणपत्रच प्राप्त झाले आहे, त्यामुळे आजार खरा की खोटा हे सिध्द झाले आहे. त्यामुळे त्यांना माझं चॅलेंज स्विकारावे. शहरात आपल्याविरुध्द आंदोलन करणाऱ्यांना मीच मोठे केले आहे. गौण खनिज प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या चौकशीत माझे नाव नव्हते, शेवटच्या क्षणी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून खडसे कुटूंबियांचे नाव घेण्यात आले. या प्रकरणात ठेकेदाराला जबाबदार धरुन नोटीस देणे अपेक्षित होते. संबंधित ठेकेदार आजही दंडाची रक्कम भरायला तयार आहे. आपण महसूलमंत्री असतानाच गौणखनिज बाबत धोरण ठरविले होते.
तीन मंत्री पण एकही प्रकल्प नाही
जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकही प्रकल्प जिल्ह्यात आला नाही. दोन वर्षापूर्वी कापसाला १२ हजार रुपये भाव होता, आता सहा हजार आहे. शेतकऱ्यांचा आत्मा जळतो आहे. संकटमोचक आहेत तर शेतकऱ्यांवरील हे संकट दूर करा. जळगावात मंजूर झालेले कृषी महाविद्यालय राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरला घेऊन गेले तर दुसरे महाविद्यालय अब्दुल सत्तार सिल्लोडला घेऊन गेले. मी मंत्री असताना बोदवड व धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली. महाजन यांनी शेंदूर्णी किंवा पहूर यापैकी एक तरी तालुका निर्माण करावा, आपण त्यांचा जाहिर सत्कार करु. खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्याला भाजपचे संस्कार शिकवू नये, असेही खडसे म्हणाले.उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून दखल नाही.