जळगाव - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारांनी बंड केल्याने राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झालं आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटर हँडलसह फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी "आयुष्यात एकच नियम पाळा ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना हरवण्याची स्वप्ने कधीच पाहू नका..." अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. खडसेंच्या याच ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्या जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या म्हणून सध्या त्या राजकारणात सक्रिय आहेत.
बंडखोरांवर साधलाय निशाणा?
रोहिणी खडसे यांनी केलेल्या ट्विटमधून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या संकटाच्या काळात शिवसेनेसोबत असल्याची भूमिका जाहीर केली आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी केलेल्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.