जळगाव - राज्याचे माजी मंत्री आणि जामनेर येथील भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर कोरोनाच्या राजकीय व्हेरिएंटवर फटकेबाजी सुरु झाली आहे. महाजन यांना मोक्का लागण्याच्या भीतीने कोरोनाची लागण झाल्याचा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मारला होता. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक टोलेबाजी सुरू आहे. एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा महाजनांना टार्गेट केलं असून खोचक टोला लगावला आहे.
गेल्या महिन्यात बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाजन आणि खडसे यांच्यात अशी टोलेबाजी रंगली होती. आता कोरोनाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा ती रंगली आहे. एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे, असा प्रतिटोला महाजन यांनी लगावला होता. त्यानंतर, आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर बोचरी टीका केली आहे. नाथाभाऊंना ठाण्याच्या हॉस्पीटलमध्ये नेण्याची गरज नाही, पण गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे, असे म्हणत नाथाभाऊंनी खोचक टोला लगावला आहे. तसेच, आज मोक्यासंदर्भात जे छापे पुण्यात पडले ते आणि मी जे काल काही बोललो तो केवळ योगायोग समजावा, असेही खडसेंनी म्हटले.
मुंबईत एका लग्न समारंभातून परतल्यानंतर महाजन यांना त्रास जाणवू लागला. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ते जामनेर येथेच गृहविलगीकरणात आहेत. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमदार महाजन यांनी केले आहे. महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी जामनेर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे सर्व कार्यक्रम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडले.
मोक्काच्या भीतीने महाजन यांना कोरोना : खडसे
गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीतीपोटी त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असावी, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजन यांना हाणला होता. गिरीश भाऊ, लवकर बरे व्हावे त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे मी प्रार्थना करणार आहे, असा चिमटा ही त्यांनी काढला. शिरसाळा ता. बोदवड येथे पत्रकारांशी बोलतांना खडसे यांनी वरील टोलबाजी केली.
काय म्हणाले होते महाजन
एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे. ईडीची नोटीस मिळताच एका महिन्यात चार वेळेस कोरोनाचे खोटे सर्टिफीकेट त्यांनी मिळविले आहे. जावई सहा महिन्यापासून जेलमध्ये आहे. आपण जेलच्या उंबरठ्यावर आहात. गृहमंत्र्यांवर दबाव आणून माझेवर खोटा गुन्हा दाखल करवून घेतला. जनता सर्व जाणून आहे. भविष्यात काय होणार याची चिंता तुम्ही करा.