जळगाव : रावेरची जागा राष्ट्रवादीला सुटली तर आपणच उमेदवार असू, मंत्री गिरीश महाजन यांनी पळ न काढता लोकसभा निवडणूक लढवावीच असे खुले आव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे. रावेर मतदारसंघात कॉग्रेसचा ३० वर्षापासून मोठ्या फरकाने पराभव होत आला आहे, म्हणून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. येत्या आठ दिवसात जागा वाटप होतील तेव्हा सारेच स्पष्ट होईल, असेही खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी शनिवारी जळगावातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रावेरची जागा आमची असल्याचे सांगितले, ते त्यांचे म्हणणे स्वाभाविक आहे. शेवटी आघाडी ठरवेल कोणती जागा कोणाला द्यायची ते. कॉग्रेसला जागा सुटली तर डॉ.उल्हास पाटील किंवा अन्य कोणी उमेदवार असले तर त्यांना निवडून आणू. भाजपमधून बाहेर पडलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तुम्ही परत जाणार का? या प्रश्नावर खडसे म्हणाले, तावडे माझे चांगले मित्र आहेत. एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना माझ्याविषयी सहानुभूती आहे. जुने लोक आले तर ताकद वाढेल असे त्यांना वाटते. मात्र भाजपने माझा जो छळ केला आहे, त्यामुळे मी कदापीही भाजपात जाणार नाही. आताच इडी आणि एसीबीचा जामीन घेतला आहे. शिवाय मी अजून पाच वर्ष आमदार आहे.
जळगावच्या जागेसाठी प्रभावशाळी व्यक्तीची इच्छा
जळगावची जागाही आम्ही मागितली आहे. या मतदारसंघातील एक प्रभावशाली व्यक्ती आहे, जी राजकारणात नाही. पण त्यांनी या जागेवर निवडणूक लढविण्याची इच्छा शरद पवारांकडे व्यक्त केली आहे. आठ महिन्यापूर्वी पवार व ही व्यक्ती विमानात सोबत होते, तेथेच ही चर्चा झाल्याचे खडसे यांनी सांगितले.
डॉ.केतकी पाटील भाजपकडून लढणार
डॉ.उल्हास पाटील कॉग्रेसचे आहेत. त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप त्यांच्या संपर्कात किंवा ते भाजपच्या संपर्कात असावेत. त्या भाजपकडून लढणार असेही ऐकतो आहे. मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे खडसे म्हणाले. गिरीश महाजन यांच्या हातात आता काहीच राहिलेले नाही. रक्षा खडसे किंवा गिरीश महाजन यांच्या तिकिटाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुनच होईल.