जळगाव - भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स अडकविण्यात आल्याची चर्चा आहे. आता खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू मांडली आहे. त्यावेळी, जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही नाथाभाऊंनी प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही त्यांनी स्पष्टचं सांगितलं.
एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. आता, एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. केवळ 2 कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहारप्रकरणात माझा ईडीचा तपास होत आहे. ते कर्जही मी नियमाने फेडले आहे. विशेषत: ईडीची कारवाई हजार-बाराशे कोटी रुपयांच्या प्रकरणात होत असते, असे खडसेंनी म्हटले. माझ्या जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत. एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक बिघडायला का मी विश्वामित्र आहे? असा सवालच एकनाथ खडसेंनी विचारला. मी साधा माणूस आहे. पण, मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे, म्हणून हे केले जात आहे, असंही खडसेंनी म्हटले.
गद्दार ओळखला
राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते, याची आपल्याला माहिती मिळाली. भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितलं. खडसेंनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका करत, आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या, इन्कम टॅक्स लावल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.