प्रशांत भदाणे
जळगाव - जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीनंतर मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो हटवण्यात आला. या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.
जळगाव जिल्हा दूध संघावर गेल्या सात वर्षांपासून एकनाथ खडसे यांचं वर्चस्व होतं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने दूध संघाची एकहाती सत्ता मिळवत खडसे यांचे वर्चस्व खालसा केले.
दूध संघाच्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाची पहिलीच बैठक रविवारी सकाळी पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो तातडीने हटवण्यात आला.
दरम्यान, एकनाथ खडसे यांचा फोटो पाठवण्यात आल्यासंदर्भात पत्रकारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा केली असता, मला कळत नाही अध्यक्षाच्या केबिनमध्ये खडसे यांचा फोटो कसा काय लागू शकतो. जिवंतपणी एखाद्या व्यक्तीचा फोटो कसा लावता येतो? प्रोटोकॉल असेल तर आपण एखाद्या व्यक्तीचा लावू शकतो. पंतप्रधान, राष्ट्रपती तसंच मुख्यमंत्री यांचे फोटो लावता येतात. पण व्यक्तीचा फोटो लावता येत नाही. म्हणून निवडून आलेल्या सर्व संचालकांनी खडसेंचा फोटो खाली घेण्याची विनंती केली. त्यानुसार शिपायाच्या मार्फत आम्ही तो फोटो काढायला लावला, असे गिरीश महाजन म्हणाले.