लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सरकार बनविण्यासाठी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या मदतीची गरज भासू शकते आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही नेत्यांना काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या सोबत येण्याची `ऑफर’ दिली असावी, असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. आपला भाजप प्रवेश लोकसभा निवडणुकीनंतर होईल, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी देशातील काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे म्हटले होते. त्यानंतर मोदी यांनी, नंदुरबारमधील सभेत बोलताना, शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या सोबत यायला हवे, असे मत व्यक्त केले होते. तो संदर्भ घेऊन, देशात सत्ताविरोधी लाट असल्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरेंची सरकार बनविण्यासाठी मदत लागू शकते म्हणून मोदींनी त्यांना `ऑफर’ दिली असावी, असे खडसे वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.
भविष्याची नांदी...
राजकारणात काहीही होऊ शकते. मोदींचे वक्तव्य भविष्याच्या राजकारणाची नांदी असावी. त्यामुळे त्या वक्तव्याचा अर्थ जो तो आपल्या परीने काढत आहे. आगामी काळात तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको, असेही खडसे म्हणाले. आपल्या भाजप प्रवेशाबाबत वरिष्ठ नेते अनुकूल आहेत तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे; पण लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष प्रवेश होणारच आहे, असेही ते म्हणाले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच पुन्हा सत्ता येणार, ४ जूननंतर तुम्हाला समजेलच, असा दावाही खडसे यांनी केला.
सुरेशदादांचे निवासस्थान बनले राजकारणाचा केंद्रबिंदू
दोन दिवसांपूर्वी उद्धवसेनेचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेले ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांचे निवासस्थान शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले. सकाळी उद्धवसेनेच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर लगेच दुपारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली. त्यानंतर सुरेशदादा जैन यांनी जळगाव आणि रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. पाठोपाठ सुरेशदादा जैन यांनी भाजपच्या दबावातून हा निर्णय घेतल्याचा आरोप, उद्धवसेनेच्या संजय सावतांनी पत्रकार परिषदेत केला, तर सुरेशदादा जैन हे दबावात येणारे व्यक्तिमत्त्व नसल्याचे, प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिले.
उद्धवसेनेच्या शिष्टमंडळानंतर भाजप नेतेमंडळींशी चर्चा
दोन दिवसांपूर्वीच सुरेशदादा जैन यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. शनिवारी सकाळी ११:३० वाजता उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जळगाव महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन आणि उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेशदादा जैन यांचे निवासस्थान गाठले. शिष्टमंडळाने त्यांच्याशी ३० मिनिटे चर्चा केली. दुपारी १:३० वाजता गिरीश महाजन, जळगाव मतदारसंघातील भाजप उमेदवार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्यासह माजी नगरसेवक दाखल झाले.त्यानंतर भाजपला पाठिंबा देत असल्याचे, सुरेशदादा जैन यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले.