- विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने काय केले आणि काय केले नाही, हे आधी एकनाथ खडसे यांनी पहावे व नंतर माझ्यासह गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करावी. खडसे यांनी 'तू-तू, मैं-मैं' करण्यापेक्षा आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्यावा, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर केली.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हे यापूर्वी 'तू-तू, मैं-मैं' करत होते व आता दोन्ही एका सरकारमध्ये मंत्री असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी आमच्याकडे पाहण्यापेक्षा आपण काय केले हे अगोदर पाहावे. अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोणतेच प्रश्न मार्गी लावले नाही, त्याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले. उलट खडसे यांनी 'तू-तू, मैं-मैं' करू नये असा सल्ला देखील दिला.
ओबीसी विषयी काळजी करू नयेराज्य मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांच्यासह ओबीसी आमदारांना डावलण्यात आल्याची टीका खडसे यांनी केली होती. त्याविषयी महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळात माझ्यासह गुलाबराव पाटील व अनेक मंत्री ओबीसी आहेत. अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी होणे बाकी आहे, त्यात अनेकांना स्थान मिळणार आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी ओबीसींवर अन्याय होत असल्याविषयी काळजी करू नये, अशी टिपणी केली.
जिल्ह्यासाठी मोठा निधी आणणारराज्यातील विविध प्रश्नांसह जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय संकुलचा (मेडिकल हब) प्रश्न अडीच वर्षात रखडला आहे. तो मार्गी लावण्यासह विविध विकास कामांसाठी तसेच जळगाव शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणला जाईल, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.