प्रशांत भदाणे
जळगाव- जळगाव जिल्हा दूध संघातील सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीचे लोणी आणि दूध पावडरच्या अपहारप्रकरणी अखेर जळगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात पोलीसच फिर्यादी झाले आहेत.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचं 14 टन लोणी आणि 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. हा अपहार दूध संघाच्या अध्यक्षा, कार्यकारी संचालक तसेच काही कर्मचाऱ्यांनी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केलं होतं. त्याचप्रमाणे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी देखील पोलिसांना या प्रकरणात जबाब देताना दूध संघात सुमारे सव्वा कोटी रुपयांचं 14 टन लोणी व 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याचा जबाब पोलिसांना दिला होता. परंतु नंतर त्यांनी पोलिसात जाऊन हा अपहार नसून चोरी असल्याची तक्रार केली होती. दरम्यानच्या काळात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, त्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी या प्रकरणात ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केल्याचे स्पष्ट झाले. हाच मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दूध संघातील जबाबदार संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल केला आहे. यात पोलीसच फिर्यादी झाले आहेत. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची तक्रार, त्याचप्रमाणे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचा सुरुवातीचा जबाब व नंतरची तक्रार या सर्व बाबींची चौकशी पोलिसांनी केली. त्यात मनोज लिमये यांनी काढलेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबन आदेशात अपहार केल्याचे नमूद आहे. त्यावरून दूध संघात अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे डॉ. मुंढे म्हणाले.