जळगाव - शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यात सभा घेत बंडखोर आमदारांना लक्ष्य केलं. शिवसेनेत बंडखोरी करण्यासाठी बंडखोर आमदारांना तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले. मात्र, पक्षासोबत गद्दारी करून या बंडखोर आमदारांना काय मिळाले, तर ‘बाबाजी का ठुल्लू’, असा घणाघात आदित्ययांनी पाचोरा येथील शिवसंवाद रॅलीत केला. अप्रत्यक्षपणे आदित्य यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर देत युती शिवसेनेनं नाही, तर भाजपनेच तोडली, असा गौप्यस्फोटही केला.
गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर टिका करताना एकनाथ खडसेंचं उदाहरण दिलं होतं. शिवसेनेसोबतची युती तोडणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासोबत कसे बसतात, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचाला होता. पाटील यांच्या या प्रश्नाचं उत्तर आता एकनाथ खडसेंनी दिलं आहे. ''शिवसेना-भाजप युती तोडण्याचा निर्णय हा एकनाथ खडसेंचा नव्हता तर हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सामूहिक निर्णय होता, त्यात देवेंद्र फडणवीससारखे नेते होते. केंद्रातील भाजप सरकारची मान्यता या निर्णयाला होती, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवीदीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्याबाबत भाष्य केले होते. उध्दव ठाकरे यांनी ज्यांनी शिवसेना संपविण्याचे प्रयत्न केले त्या भाजपसोबत बंडखोर गेल्याची टीका केली होती. याबाबत ते म्हणाले की, ज्या एकनाथराव खडसे यांनी युती तोडली त्यांच्या सोबतच तुम्ही बसले. तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का ? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तर, आम्ही गद्दार नसून खुद्दार असल्याचेही ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
आदित्य ठाकरेंना गुलाबरावांचे उत्तर
आदित्य ठाकरे हे तरूण असून त्यांनी मंत्री बनल्याबरोबर राज्यभरात फिरावे अशी आमची सर्वांची इच्छा होती. मात्र, ते तेव्हा फिरले नाहीत. तर आता सत्ता गेल्यानंतर ते राज्यभरात फिरत आहेत. त्यामुळे आम्ही म्हणत होतो ते खरेच होते असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिवसेना वाचावी हा आमचा प्रयत्न होता. यासाठी आम्ही परिश्रम केले. मात्र त्यांनाच हे नकोसे होते असे दिसून आले.