ऑनलाईन लोकमत
जळगाव - माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपात फार काळ राहणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केले. शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुरुवारी सायंकाळी ही पत्रपरिषद झाली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार, किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर. ओ. पाटील व चिमणराव पाटील यांची मुख्य उपस्थिती होती. खडसे यांचा विषय त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने संपला असल्याचे मतही जिल्हा दौ-यात राऊत यांनी व्यक्त केले. या विषयाचा धागा पकडत पत्रपरिषदेत विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, खडसे हे भाजपातून बाहेर पडणार हे निश्चित आहे मात्र ते कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नाही. सध्या ते अजित पवार यांच्या कानात जास्त बोलू लागले आहेत आणि पवारही त्यांना टाळ्या देवू लागले आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. खडसे यांच्या बद्दल सेनेला सहानुभूती खडसे हे शिवसेनेत येण्यास तयार असले तर पक्षाची काय भूमिका राहील ? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि भाजपा युती ही खडसेंच्या तोंडूनच तुटली. युती तुटल्याचा त्यांना आनंदच झाला. मात्र शिवसेना संपविण्याचा ज्यांनी ज्यांनी र्पयत केला ते स्वत: च संपले हा आजर्पयतचा इतिहास आहे. तरीदेखील आम्हाला त्यांच्या बद्दल सहानुभूती आहे. ते शिवसेनेत येण्यास उत्सुक असल्यास पक्षप्रमुखांशी चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी भविष्यातील देशाचे नेते गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नेतृत्व क्षमता चांगली दिसून आली. ते भविष्यातील देशाचे नेते आहेत. गुजरातमध्ये भाजपाचा विजय हा अपमानास्पद विजय आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 सभा या निवडणुकीत घेतल्या. सर्व प्रकारची शक्ती लावली तरीही काठावर विजय मिळाला. यामुळे ही एक प्रकारे भाजपाची हारच आहे. अहंकारी पक्षांसाठी गुजरातची निवडणूक ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. भाजपाचे मंत्री गिरीष बापट यांनीही याबाबत नुकतेच वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मनातच काही तरी चालले आहे, हे दिसून येते. निवडणुका केव्हाही लागल्या तरी आम्ही तयार आहोत, असे सांगताना आगामी निवडणुकीत युती होईल का? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.