जळगाव : पंधरा वर्षे डबघाईस गेलेल्या महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात ‘महानंद’ची स्थिती गेल्या चार वर्षात सुधारुन भरभराट आली आहे व आता हा दूध संघ आयएसओ मानांकन प्राप्त करणारा ठरला आहे, असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. गेल्या आठवड्यात जळगावात आलेले पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी खडसे यांचे नाव न घेता महानंदमध्ये गेल्या चार वर्षात राजकारणच झाले, अशी टीका केली होती. त्याला एकप्रकारे खडसे यांनी उत्तर देत केदार यांचा दावा खोडून काढला.एकनाथराव खडसे हे दिल्ली येथून शुक्रवारी सकाळी जळगावात आले. त्या वेळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महानंदच्या विषयासह फोन टॅपिंग, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात जाण्याची चर्चा तसेच जिल्हा बँक व जिल्हा दूध संघाच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला.‘महानंद’ला आयएसओ‘महानंद’च्या चेअरमनपदी गेल्या चार वर्षांपासून एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आहेत. गेल्या आठवड्यात मंत्री सुनील केदार हे जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी ‘महानंद’मध्ये गेल्या चार वर्षात केवळ राजकारणच झाले, अशी टीका केली होती. त्यानंतर या विषयावर ७ रोजी पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी केदार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘महानंद’ दूध संघ पूर्वी प्रगतीपथावर होता. मात्र, नंतरच्या कालखंडात महानंदमध्ये प्रचंड राजकारण वाढले. त्यामुळे हा दूध संघ डबघाईला गेला होता. त्यानंतर महानंदमध्ये आता भरभराट झाली आहे.जवळचा नेता केंद्रात असल्यास लाभ होतोमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागणार असल्याचे आपण देखील ऐकले असून तसे झाल्यास या निर्णयाचे स्वागतच आहे. फडणवीस अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा केंद्राला तर फायदा होईलच शिवाय राज्यालाही केंद्राच्या अनेक योजना मिळण्यास मदत होईल. एखादा जवळचा नेता केंद्रात असेल तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, असेही ते म्हणाले. खडसेंच्या या प्रतिक्रियेवरून फडणवीस आणि त्यांच्यातील दुरावा कमी झाला की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.फोन टॅपिंगचे सत्य चौकशीत समोर येईलदेवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधी पक्ष नेत्यांसह माझेही फोन टॅप दझाल्याचे वाचनात आले. मात्र त्यावर माझा विश्वास नाही, असे स्पष्ट मत खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर व्यक्त केले. खरच माझे फोन टॅप झाले असतील तर हा दुर्दैवी प्रकार आहे. राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करीत आहे, त्यात सत्य बाहेर येईलच. त्यामुळे या विषयी अधिक भाष्य करणे योग्य नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले.जिल्हा दूध संघाच्या एमडींनी परस्पर काढला वाढीव पगारजिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार गौतम यांच्या राजीनाम्याविषयी खडसे म्हणाले की, गौतम यांनी संचालक मंडळाची परवानगी न घेता स्वत:चा पगार परस्पर वाढवून घेतला व दोन ते तीन महिन्याचा वाढीव पगारही (एरिअस) काढून घेतला. त्यामुळे संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा घेतला.जिल्हा बँक भरतीत पारदर्शकतेवर भरजिल्हा बँकमध्ये सुरू असलेल्या नोकर भरतीप्रकरणी बोलताना खडसे म्हणाले की, या भरतीसाठी इनकॅमेरा मुलाखती होणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर राहणार असून ज्या एजन्सीकडून ही भरती होत आहे, ती एजन्सी राष्ट्रीयकृत बँकांचीही भरती करते. त्यामुळे पारदर्शक नोकर भरती जिल्हा बँकेत होईल, असा दावा खडसे यांनी या वेळी केला.
डबघाईस आलेल्या ‘महानंद’ची चार वर्षात भरभराट - एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:52 AM