खरं तर ऋग्वेद आणि अथर्ववेद यांनाच मूळ वेद मानता येईल़ यजुर्वेदातला बराचसा भाग ऋग्वेदातलाच आहे़ ऋग्वेदातले मंत्र छंदबद्ध आहेत़ अथर्ववेदात मात्र गद्यही आहे़ समावेदातील बराचसा भाग ऋग्वेदातूनच घेतला आहे़ ऋग्वेदाशिवाय पंच्याहत्तर सूक्तं यात लयबद्ध, तालासुरात गाता येतील अशी आहेत़ वेदांना त्रयी विद्या असे म्हणतात़ अथर्ववेदाला मागाहून मान्यता मिळाली़ ऋग्वेदात एकूण दहा मंडले आहेत़ यातल्या पहिल्या मंडलातील पहिल्या सूक्ताचा आरंभ बघा़ ही एक ऋक् किंवा ऋचा आहे़ ऋचा म्हणजे ऋग्वेदाचा प्राथमिक छंदबद्ध घटक़ याचा अर्थ असा की, मी अग्नीचं स्तवन करतो़ अग्नी आमच्या यज्ञाच्या अग्रभागी आहे़ तो यज्ञासाठी देवताना बोलावून आणतो़ तो स्वत: देवरूप आहे़ यज्ञकर्ताही तोच़ तो आहे देवतांचं मुख़ दान देणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ तोच़ दान स्वीकारणाऱ्यांमध्येही त्याची महती मोठी़ मी त्या अग्निची स्तुती करतो़ इंद्र, वरुण, मरुत, अश्वी, सोम, मित्र, उषा अशी नाना दैवते़ यांची स्तवने यात आहेत़ त्यांना ‘सूक्त’ वा ‘मंत्र’ म्हणतात़यातील काव्यसौंदर्य अप्रतिम आहे़ काही उदाहरणं बघूया, ‘‘अग्नी सुकोमल काष्ठात वसून असतो़ एखादा गृहस्थ कसा आपल्या प्रकोष्ठात सुखेनैव पहुडलेला असतो़.. अगदी तसाच़ काष्ठ खंडे त्याला संघर्षासाठी आव्हान देतात़ मग तो आपल्या तेजोमय रूपात प्रकट होतो़ ‘‘अग्नीची किरणं तेजोमय आहेत़ प्रकाशभरित आहेत़ सर्वपदी आहेत़ त्याचे नेत्र म्हणजे सृष्टिजगतातील नेत्र होत़ त्याचे मुख या सृष्टिजगतातील तमाम मुखं. ही सारी सुललित़ जळावर जशी प्रतिबिंब़ ती अतिरंजित होऊन प्रकटतात़ तशी ही अग्निकिरणं़ ही तेजोमय प्रतीत होतात़’’ वायू कुठे उत्पन्न झाला? हा तर परमात्म्याचा जीवन प्राण़ हा तर वसुधेचा महान पुत्ऱ हा वायुदेव़ हा हवं तिथं स्वच्छंद विचरण करतो़ त्याचा सुकोमल पदरव़ तो आपण ऐकू शकतो़स्तोत्रे रमणीय़ सहजसुंदऱ सुकोमल़ त्यांच्या अलंकृत स्वरूपाविषयी नेमकेपणानं कोण सांगू शकेल? वैदिक कवींची काव्यप्रतिभा विलक्षण़ ती एकाच वेळी धरणी आणि आकाशाला गवसणी घालते़ या पल्याड वसणाºया निसर्गाच्या नाना रूपांमध्ये ती अवगाहन करते़वेदातील स्तोत्रांंची भाषा सलगीची़ लडिवाळपणाची़ मन:पूर्वक़ एकदा ऋषी म्हणाला, ‘‘हे अग्ने, काळजीपूर्वक ऐक़ तू माझ्याजागी असतास आणि मी तुझ्याजागी़, तर तुझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या असत्या़देवाला भक्तांचा कंटाळा नाही येत़ तो भक्तासांठी वेगवेगळी रूपं धारण करतो़ तो भक्तांमध्ये मिसळतो़ खेळतो़ गातो़ नाचतो़ रूसतो़ रागावतो़ मनधरणी करतो़ सख्यभक्तीच्या अशा कल्पनाही ऋग्वेदात आहेत. ऋषी देवापाशी नाना प्रकारचं मागणं मागतो़ काय काय मागतो तो? बघूया तऱ तो मागतो़़़ हे उषे, तू आम्हास गाई दे. वीरपुरुष दे. अश्व दे. विपुल अन्न दे. आमच्या यज्ञाची लोकांमध्ये निंदा न होवो. हे देव हो, आशीर्वाद द्या़ आमचं सदैव रक्षण करा़ हे इंद्रा, आम्हास श्रेष्ठ प्रकारची सर्व संपत्ती दे़ बुद्धिमत्ता दे़ कामाचा सुबकपणा दे़ आमच्या द्रव्याची वाढ कऱ आम्हाला देहाचं आरोग्य दे़ दे आम्हाला वाणीची रसाळता़ आम्हाला दिवसाची अनुकूलता दे़-प्राचार्य डॉ.विश्वास पाटील, शहादा, जि.नंदुरबार
वेदांचा अर्थविस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:54 PM