लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात एका खासगी रुग्णालयात दाखल ६२ वर्षीय रुग्णाला व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने अखेर या रुग्णचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. नातेवाईकांनी शनिवारची पूर्ण रात्र व्हेंटीलेटर कुठे उपलब्ध होईल का? याचा शोध घेतला मात्र, ते उपलब्ध झाले नव्हते. दामोदर हरी पाटील असे मृत रुग्णांचे नाव आहे.
दामोदर पाटील यांनी २ एप्रिलला लस घेतली होती. काही दिवस त्यांना त्रास झाला. नंतर त्रास वाढल्याने त्यांनी १८ रोजी टेस्ट केली शिवाय मी नंदुरबार येथून आलो व त्यांचा एचआरसीटी करून घेतल्याचे त्यांचा मुलगा मनोहर पाटील यांनी सांगितले. वडिलांचा एचआरसीटीचा स्कोर हा ५ होता. त्यांना त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्रास वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. बुधवारी पुन्हा एचआरसीटी केल्याने स्कोर २१ होता. अचानक वाढलेला स्कोर पाहून आम्ही घाबरलो. मात्र, संसर्ग अगदीच झपाट्याने वाढू शकतो, असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले होते. शनिवारीच त्यांना व्हेंटीलेटर लागेल, आमच्याकडचेही दोनही व्हेंटीलेटर रुग्णांना लावल्याची कल्पना डॉक्टरांनी आधीच दिली होती. आम्ही पूर्ण दिवस व पूर्ण रात्र व्हेंटीलेटर कुठे उपलब्ध होईल का? शोधले मात्र, ते उपलब्ध झाले नाही. अखेर रविवारी सकाळी वडिलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कदाचित वेळेवर व्हेंटीलेटर उपलब्ध झाले असते तर ते बचावले असते, असे मनोहर पाटील यांनी सांगितले. मनोहर पाटील हे नंदुरबार जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत.