लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौर व उपमहापौर पदासाठी १८ रोजी होणारी निवडणूक ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी महापौर भारती सोनवणे व गटनेते भगत बालाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाइन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भारती सोनवणे यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक व नगरसेविका या अशिक्षित असल्याने ऑनलाइन सभेत मोबाइल हाताळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच इंटरनेट यंत्रणा ठप्प झाल्यानेदेखील ऐनवेळी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. यासह इतर महानगरपालिकांमध्ये स्थायी समिती सभापतीची निवडणूक ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करून महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूकदेखील ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, अशी मागणी भारती सोनवणे यांनी केली आहे.