लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नोटीस देऊनही ९० दिवसांच्या आत कर न भरणाऱ्या उपसरपंचांसह १२ सदस्यांवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी अपात्रतेची कारवाई केली. १३ पैकी केवळ सरपंच सुमनबाई इच्छाराम वाघ यांनी वेळेत कर भरल्याने त्या वगळून अन्य सर्व सदस्यांवर कारवाई झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुरुवारपासून (दि. १०) पुढील सहा वर्ष या सदस्यांना निवडणूक लढविता येणार नाही.
डोंगर कठोरा ग्रामपंचायतीत सरपंचांसह १३ सदस्य होते. घरपट्टी न भरणाऱ्या सदस्यांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. ९० दिवसात हा कर भरणे बंधनकारक असते. दरम्यान, ९० दिवस उलटल्यानंतरही या सदस्यांनी कर भरलेला नव्हता. दरम्यान, २०१९-२० मध्ये यावल गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यात सरपंच सुमनबाई वाघ यांनी ९० दिवसांच्या आत कर भरणा केल्याचे तसेच चार सदस्यांनी ९० दिवसांनंतर भरणा केल्याचे तसेच आठ सदस्यांनी करच भरलेला नसल्याचे समोर आले होते. त्यानुसार हा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी या सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण पाठविले होते. त्यानुसार ३ डिसेंबरला सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर अखेर या बारा सदस्यांवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १४ ह प्रमाणे अपात्रतेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधिअधिकारी ॲड. हरूल देवरे यांनी दिली.
कुटुंबातील सदस्यांनाही नो एण्ट्री
उपसरपंचांसह या बाराही सदस्यांचा कार्यकाळ संपलेला होता. या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुरुवारपासून (दि.१०) पुढील सहा वर्ष या सदस्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एकत्रित कुटुंब असल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही निवडणूक लढविता येणार नाही, अशी माहिती दिली आहे. दरम्यान, अपात्रेची ही जिल्हाभरातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
९० दिवस उलटल्यानंतर यांनी भरला कर
उपसरपंच नितीन भागवत भिरुड यांनी ९६ दिवसांनी
सदस्य रत्नदीप मुरलीधर सोनवणे यांनी १६२ दिवसांनी
सदस्य यदुनाथ प्रेमचंद पाटील यांनी १६२ दिवसांनी
तर प्रीती विनोद राणे यांनीही ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीने हा कर भरला.
यांनी कर भरलाच नाही
निसार सरदार तडवी, प्रीतम प्रकाश राणे, शशिकला विजय भिरुड, हलिमा रफिक तडवी, रेखा लुकमान तडवी, हसिना सुपडू तडवी, अनिता मनोहर बाविस्कर यांनी कराचा भरणा केलेला नाही.
पाच टक्के व्याजही आणि दंडही
सदस्यांनी कर भरावा, असा ठरावही ग्रामसभेत करण्यात आला होता. मात्र, तरीही ८ सदस्यांनी करच भरला नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले होते. ज्या सदस्यांनी करच भरलेला नाही. त्या सदस्यांकडून ५ टक्के नोटीस फी, ५ टक्के दंड आणि ५ टक्के व्यास आकारणी तसेच पूर्ण कर आकारावा असे पत्रही जिल्हा प्रशासनाकडून ग्रामसेवकांना देण्यात आल्याची माहिती ॲड. देवरे यांनी दिली.