अमळनेर, जि.जळगाव : ही निवडणूक गल्लीची नसून, दिल्लीची आहे. देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. देशाला कोण सुरक्षित ठेवून विकासाकडे नेऊ शकतो याचा निर्णय घेणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अमळनेर येथील विजय संकल्प सभेत केले.काँग्रेसचे सरकार दुराचारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी होते, मात्र मोदी सरकारने पाच वर्षात देशात परिवर्तन केले. सामान्य नागरिकांत परिवर्तन झाले, गरीबात परिवर्तन होऊन स्वाभिमानाने देश उभा राहिला आहे. ८० हजार कोटी रुपये जनधनच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. काँग्रेसच्या दलालांचे जाळे तोडण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. ९८ टक्के घरात शौचालये बांधली आहेत. १३ कोटी कुटुंबांना मोफत शौचालये देण्यात आली. महाराष्ट्रात १० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यापैकी पाच लाख घरे पूर्ण झाली आहेत. ७२ लाख शेतकऱ्यांना ४७०० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वात महत्वाच्या पाडळसरे प्रकल्पामुळे ६७ गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. मंत्री गिरीश महाजनांना हे काम सोपवले आहे. नाबार्डपुढे प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात मोदींशी बोललो आहे. गडकरींशी बोललो आहे. पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे काम आपले सरकार करेल. केंद्रात जलशक्ती मंत्रालय सुरू होतेय. नदीजोड प्रकल्प सुरू होतील. ही निवडणूक निव्वळ विकासाची नसून, राष्ट्रीय अस्मितेची आहे. भारताने हल्ला केल्याचा पुरावा मागणारे दोनच घटक होते ते म्हणजे पाकिस्तान आणि काँग्रेस राष्ट्रवादीची महाखिचडी. त्यांचा जाहीरनामा म्हणतो पाकशी युद्ध नको, चर्चा करू. देशद्रोहाचे कलम १२४ अ काढण्याचे काँग्रेस म्हणत आहे. त्यामुळे अशा देशद्रोह्यांना मतदान करणार का, असा सवाल त्यांनी जनतेला केला. कोण खासदार होणार हे महत्वाचे नाही. हा देश राहिला पाहिजे. भारत राहिला पाहिजे. हिंदुस्थान राहिला पाहिजे. देशविरोधींचा नायनाट करावा म्हणून नरेंद्र मोदींच पंतप्रधान झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कॅप्टनने पॅड बांधले. बॅट हातात घेतली. मैदानावर उतरले आणि बाराव्या खेळाडूप्रमाणे न खेळताच परतले, तर त्यांचे चेले चपाटे काय खेळणार? तसेच राहुल गांधी म्हणतात की, गरिबी हटवू. मात्र पाच पिढ्यांपासून तेच सांगायला त्यांना लाज कशी वाटत नाही?व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी मंत्री एम.के. अण्णा पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे गुलाबराव वाघ, रवींद्र चौधरी,पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, अमळनेरच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.राजेंद्र पिंगळे, विजय पाटील, श्याम संदानशिव, यशवंत बैसाणे उपस्थित होते.मंत्री गुलाबराव पाटील,आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, आमदार उन्मेष पाटील यांची भाषणे झाली.सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.माले बोलाले लावू नका मी चुकाई जासमुख्यमंत्री येण्यापूर्वी जनतेतून साहेबराव पाटील यांना उद्देशून ‘एकच वादा’ ‘साहेबराव दादा’ म्हणून घोषणा करून त्यांना बोलण्याचा आग्रह केला. मात्र त्यांनी माईक हातात घेऊन अहिराणी भाषेत मनावर काही भी बोलाई जास. माले बोलाले लावू नका, असे म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा सुरू केल्या. मात्र त्या न जमल्याने त्यांनी माईक सोडून संचालकांच्या हातात दिला. सभेनंतर ते पोलीस स्टेशनला येऊन पाडळसरे जनआंदोलन समितीला येऊन भेटले आणि समितीची टोपीही घातली.अमळनेरला गेल्या आठवड्यात भाजपच्या मेळाव्यात राडा झालेल्या भाजप जिल्हाध्यक्ष उदय आणि माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांना व्यासपीठावर विरुद्ध दिशेने बसवले होते. गिरीश महाजन यांनी त्यांना बोलण्यास नकार दिला. सभेसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त होता.
देश कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा निर्णय घेणारी ही निवडणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 5:10 PM
ही निवडणूक गल्लीची नसून, दिल्लीची आहे. देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. देशाला कोण सुरक्षित ठेवून विकासाकडे नेऊ शकतो याचा निर्णय घेणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अमळनेर येथील विजय संकल्प सभेत केले.
ठळक मुद्देअमळनेर येथे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांची सभामुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीकामाजी आमदार डॉ.बी.एस. पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना व्यासपीठावर बसवले होते विरुद्ध दिशेनेमुख्यमंत्री येण्यापूर्वी जनतेतून घोषणा ‘एकच वादा’ ‘साहेबराव दादा’