लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा महापौर व उपमहापौरपदाचा कार्यकाळ १७ रोजी संपणार आहे. नवीन महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडून जाहीर करण्यात आला आहे. १८ रोजी महापौर व उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडणार असून, ९ ते १६ मार्च दरम्यान निवडणुकीचा अर्ज घेता येणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १७ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापौर व उपमहापौर पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. मात्र, याबाबत निर्णय घेणारे माजी मंत्री गिरीश महाजन हे विधानसभेच्या अधिवेशनात व्यस्त आहेत तर शहराचे आमदार सुरेश भोळे हे देखील कोरोनाग्रस्त असल्याने ते उपचार घेत आहेत. त्यामुळे भाजपात अनेकजण इच्छुक असले तरी महापौर व उपमहापौरपदाचे नाव विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतरच जाहीर होणार आहे.
भाजपातील अंतर्गत गटबाजी व सेनेतील भूमिकेकडे लक्ष
महापौर व उपमहापौरपदावरून भाजपात अंतर्गत गटबाजी वाढली आहे. महापौरपदावरून चार गट तयार झाले असून, पक्षातील जुने कार्यकर्ते व नव्याने पक्षात आलेल्यांमध्ये देखील रस्सीखेच पहायला मिळत आहे. तर एक गट महापौर भारती सोनवणे यांच्या मुदतवाढीसाठी प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत भाजपातील गटबाजीचा फायदा सेनेकडून होतो का ? याकडे लक्ष लागले आहे. तसेच सेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी मनपात सेनेचे बहुमत नसतानाही महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार असल्याचे जाहीर केल्याने या निवडणुकीत रंगत आणली आहे.
महापौरपदासाठी रस्सीखेच
महापौरपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे महिला नगरसेविकांमध्ये रस्सीखेच सुरु असून, प्रतिभा कापसे, दीपमाला काळे, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे यांचे नाव आघाडीवर आहे तर भारती सोनवणे या देखील मुदतवाढीसाठी प्रयत्नशील आहेत.
उपमहापौरपदासाठीही मोर्चेबांधणी
उपमहापौरपदासाठी देखील रस्सीखेच असून, अनेकांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांची भेट देखील घेतली आहे. उपमहापौरपदासाठी भगत बालाणी, डॉ.चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, धीरज सोनवणे यांचे नाव आघाडीवर आहे.
असा आहे कार्यक्रम
९ ते १६ मार्च - अर्ज खरेदी करण्याची मुदत
१७ मार्च - सकाळी १० ते दुपारी २ - अर्ज दाखल करणे
१८ मार्च - सकाळी ११ ते ११.१५ अर्ज माघार -
१८ मार्च- सकाळी ११.३० वाजता महापौर, उपमहपौर पदासाठी निवड प्रक्रिया