लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या भडगाव, वरणगाव नगरपरिषद तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या नगरपरिषदांसह नव्याने घोषित झालेल्या नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १६ नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाली आहे.
कार्यकाळ संपलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका कोरोनामुळे गेल्या वर्षापासून रखडल्या होत्या. आता संसर्ग कमी झाल्याने निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या असून या निवडणुकांविषयी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणूक प्रक्रियेविषयी कळविले आहे.
जिल्ह्यातील भडगाव व वरणगाव नगरपरिषदेचा कार्यकाळ या पूर्वीच संपलेला आहे. आता या दोन्ही नगरपरिषदांसह भुसावळ, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, फैजपूर, सावदा, बोदवड, पाचोरा या नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. यासोबतच नव्याने घोषित झालेल्या नशिराबाद नगरपरिषदेचाही यात समावेश राहणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार सोमवार, २३ ऑगस्टपासून प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली.
प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा
राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा राहणार आहे. यासाठी २०११च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या विचारात घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सोबतच आरक्षण, हद्द बदल इत्यादीविषयीदेखील सूचित करण्यात आले आहे.
तीन नगरपरिषद वगळता सर्वांची एकाचवेळी निवडणूक
जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर, शेंदुर्णी या तीन नगरपरिषद वगळता उर्वरित सर्व नगरपरिषदांच्या निवडणुका यंदा एकाचवेळी होऊ शकणार आहेत.