लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता अर्ज छाननीनंतर माघारीत नेमके काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गावागावांत राजकारण तापायला सुरुवात झाली असून आता या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारी चिन्हेही सोमवारीच वाटप होणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणते चिन्ह आपली नाव पार लावील, या विचारात उमेदवार आहे. गेल्या पंचवार्षिकपेक्षा यंदा ४० नव्या चिन्हांची भर पडल्याची माहिती आहे.
अर्ज माघारीनंतर चिन्हांचे वाटप होणार आहे. मिळालेल्या चिन्हावरच प्रचार आणि नंतर मतदान असे चित्र राहणार आहे. त्यामुळे आकर्षक चिन्हांकडे उमेदवारांचा कल असून हवे ते चिन्ह मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड राहणार आहे. १९० चिन्हांमधून उमेदवारांना चिन्ह निवडायचे असून पुढील काही दिवस हे चिन्ह त्यांची ओळख राहणार असल्याने चिन्हांना अधिक महत्त्व दिले जात आहे. स्थानिक पातळीवर पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणाला अधिक महत्त्व असल्याने अशा वेळी चिन्हांना मोठे महत्त्व प्राप्त होत असते. नवीन चिन्हांमधील नेमकी काेणती चिन्हे अधिक वापरली जातात, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
सर्वच उमेदवारांना स्वतंत्र चिन्हावर लढावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षांपेक्षा पॅनलला महत्त्व दिले जाते. मात्र, पॅनलसाठी स्वतंत्र चिन्ह नसून स्वतंत्र उमेदवार स्वतंत्र चिन्ह असे नियम घालून देण्यात आले आहेत.
सोमवारी होणार चित्र स्पष्ट
n सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज माघार घेण्याची मुदत असून सोमवारी दुपारी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. यानंतर एक फॉर्म भरून उमेदवारांना १९० चिन्हांपैकी आवडीची पाच चिन्हे निवडण्याची मुभा आहे. त्यातून क्रमवारीनुसार त्यांना एक चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला आवडीचे चिन्ह मिळेलच, असे सांगणे कठीण असून सोमवारी याबाबत निर्णय होणार आहे.
n ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षांपेक्षा स्थानिक राजकारण आणि वेगवेगळ्या चिन्हांना महत्त्व दिले जाते. त्यानुसार प्रचलित आणि सर्वांना लवकर लक्षात येईल, असे चिन्ह निवडण्याची प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते.
अशी आहेत चिन्हे
निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट
nकंगवा, हिरा, कपबशी, फुटबॉल, चष्मा, हॉकी, इस्त्री, जग, केटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेनड्राइव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली
nफलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवणयंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाइप राइटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर.