जळगाव : जो जाती-धर्माचा उल्लेख करून निवडणूक लढवित असेल त्याला विकासावर बोलण्याचा अधिकार नाही. असा उल्लेख जो करीत असेल तो कधी मदतीला तरी येतो का, असा सवाल खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित करीत कोणतीही निवडणूक जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर झाली पाहिजे, अशी अपेक्षा ‘लोकमत’ भेटीदरम्यान व्यक्त केली.मंगळवारी खासदार रक्षा खडसे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी निवडणुकांविषयी तसेच विधानसभेच्या नियोजनाबाबतही चर्चा केली. त्यांच्याशी झालेला हा संवाद...प्रश्न - विधानसभा निवडणुकीचे नियोजन काय आहे?उत्तर - तसे पाहता आता आमची ‘रिअसल’ होऊन गेली आहे. तरीदेखील विधानसभा निवडणुकीसाठी अजून ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत जातीचे मुद्दे जास्त येतील. मुळात जाती-धर्माचा मुद्दा यायलाच नको. खासदार म्हणून माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीचे चांगले निकाल पाहता महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार येईल.प्रश्न - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा त्रास झाला का ?उत्तर - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने सहकार्य केले. एक-दोन जणांनी काम केले नाही. त्याचा काही फरक पडत नाही, मात्र शिवसैनिकांनी काम केले. असे प्रकार सर्वत्र होत असतात. व्यक्तीगत वाद असू शकतात. आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जसे आदेश देईल, त्याप्रमाणे काम करावे लागेल.प्रश्न - पूर्वीपेक्षा आता जि.प. मध्ये वाद आहे का?उत्तर - पूर्वीही वाद होते, आताही आहे. बहुतांश कामे ग्रामपंचायत पातळीवरच होऊ लागल्याने जि.प. आता केवळ प्रशासकीय बदल्या करणे अथवा एक एजन्सी म्हणूनच राहिली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो. तेथे जास्त अधिकार नसले तरी जि.प. सदस्य, अधिकाऱ्यांनी शाळा व इतर ठिकाणी लक्ष दिले पाहिजे.प्रश्न - आपल्याला राज्यमंत्री पद मिळण्याची चर्चा आहे ?उत्तर - तशी चर्चा माध्यमांनीच केली आहे. महिलांच्या मंत्रीपदाची संख्या पाहता त्यांची संख्या वाढलेली आहे. मला मंत्रीपद मिळावे, तिथपर्यंत मी विचारही केलेला नाही. पद घेऊन बसण्यास अर्थ नाही, प्रत्यक्ष काम केले पाहिजे.प्रश्न - नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या भाषणाबद्दल काय वाटते ?उत्तर - पंतप्रधान नाही तर ते एक सेवक म्हणून काम करीत असतात. त्यांचे भाषणही त्यांनी त्या पद्धतीने केले. त्यामुळे ते सर्वसामान्यांना आपले वाटले. लोकांच्या अपेक्षा अजून आहे, त्यामुळे ते अधिक चांगले काम करतील.
जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर निवडणुका झाल्या पाहिजे - खासदार रक्षा खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:07 PM