अजय पाटीलजळगाव: तीन महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. जळगाव शहरात सध्या भाजपाचे आमदार असले तरी गेल्यावेळेस भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते. दरम्यान, जळगावची जागा ही शिवसेनेची असल्याने शिवसेनेकडून या जागेवर हक्क सांगितला जात आहे. तर विद्यमान आमदार भाजपाचा असल्याने भाजपा देखील ही जागा सोडण्याचा तयारीत दिसून येत नाही.हीच स्थिती कॉँग्रेस व राष्ट्रवादी ची देखील पहायला मिळत असून, युती-आघाडीच्या निर्णयावर जळगाव शहर विधानसभेचे गणित ठरणार आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना, कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आपआपल्या युती-आघाडी तोडत एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते. दरम्यान, एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा हे चारही प्रमुख पक्ष युती-आघाडी करूनच निवडणूक लढले. त्यामुळे विधानसभेत देखील युती-आघाडी कायम राहिल्यास जळगाव शहर विधानसभेची जागा युतीकडून भाजपाच्या वाट्याला जाते की शिवसेनेला मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुरेश जैन यांचा भाजपाचे उमेदवार सुरेश भोळे यांनी ४२ हजार ३१४ मतांनी पराभव केला होता.गेल्या पाच वर्षात भाजपाने शहरात संघटना मोठ्या प्रमाणात वाढवली असून, २०१८ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत देखील पहिल्यांदाच मोठे यश मिळवत ५७ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला केवळ १५ जागा जिंकता आल्या होत्या. जळगाव शहरात शिवसेना व भाजपाकडून दावा केला जात असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. दरम्यान, ही जागा शिवसेनेला गेल्यास माजी मंत्री सुरेशदादा जैन हेच शिवसेनेचे उमेदवार राहणार आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसला जळगाव शहरात अद्याप संघटन जमविता आले नसून, त्यांच्यासमोर शिवसेना-भाजपाचे मोठे आव्हान आहे. मनपा निवडणुकीत या दोन्हीही पक्षांना खाते देखील उघडता आले नव्हते.पक्षनिहाय इच्छुक उमेदवारभाजपविद्यमान आमदार सुरेश भोळे हे यंदाही भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, ललित कोल्हे, सुनील खडके हे देखील इच्छुक आहेत. तसेच ऐनवेळी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांचा पक्षश्रेष्ठींकडून विचार होवू शकतो.शिवसेनामाजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित आहे. मात्र, त्यांनी नकार दिल्यास शिवसेनेकडून माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे किंवा सुनील महाजन, यांना संधी मिळू शकते.राष्ट्रवादी व कॉँग्रेसराष्ट्रवादीकडून विलास भाऊलाल पाटील तर कॉँग्रेसकडून डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. एमआयएम कडून रियान जहागीरदार इच्छूक आहेत.
निवडणुकीचे गणित युती-आघाडीच्या निर्णयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:18 PM