लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : शिवारातील नांद्राखुर्द रस्त्यालगतच्या एका शेतात तुटुन खाली पडलेल्या वीजवाहक तारेच्या स्पर्शाने काठेवाडीच्या मालकीची गाभण म्हैस दगावल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. संबंधिताचे सुमारे ५० ते ६० हजार रूपयांचे नुकसान झाले असताना महावितरणने घटनेची उशिरापर्यंत कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसून आले.
उन्हाळ्याच्या दिवसात रिकाम्या झालेल्या शेतीशिवारात गाई व म्हशी चारण्यासाठी काठेवाडी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. त्यानुसार यंदाही काठेवाडी त्यांचे पशुधन घेऊन फिरत आहेत. त्यातील लख्खा डाह्या काठेवाडी यांच्या गाई व म्हशी गुरूवारी दुपारी विकास नामदेव चौधरी यांच्या शेतालगत चरण्यासाठी आल्यावर जमिनीवर तुटून पडलेल्या वीजवाहक तारेच्या स्पर्शाने त्यांची गाभण म्हैस जागीच तडफडून मृत्युमुखी पडली. सुदैवाने अन्य जनावरे लांब अंतरावर चरत असल्याने बचावली. दरम्यान, ममुराबादचे सरपंच हेमंत चौधरी यांनी विदगाव उपकेंद्राशी संपर्क साधल्याने वीज पुरवठा लगेच खंडित करण्यात आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेचा पंचनामा करण्यासाठी उशिरापर्यंत कुणीच फिरकले नव्हते.
--------------------
फोटो-
ममुराबाद शिवारात वीजवाहक तारेच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडलेली काठेवाडीची गाभण म्हैस. (जितेंद्र पाटील)