लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : परिसरात बुधवारी रात्री झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. गावातील महादेव मंदिराजवळ वीजपुरवठा सुरू असताना अचानक तार तुटल्याने कुत्रा ठार झाला तसेच बसस्थानकालगतची केबल जळाल्याने खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारपर्यंत सुरळीत होऊ शकला नव्हता.
ममुराबादसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला महावितरणच्या ३३ केव्ही विदगाव उपकेंद्रावरून वीज पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात महावितरणकडून ममुराबादच्या वीज ग्राहकांना कधीच चांगल्या दर्जाची सेवा मिळत नाही. एरव्ही दिवसा व रात्री अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतात. त्यात पावसाला सुरुवात होत नाही तेवढ्यात वीज वाहक तार तुटण्यासह केबल जळण्याचे प्रकार सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वीज प्रवाह सुरू असल्याच्या स्थितीत तार तुटल्याने जीवित हानी होण्याची शक्यता एरव्ही व्यक्त होत असते. मात्र, महावितरणकडून त्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचा प्रत्यय बुधवारी रात्री आल्याने जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेच्या स्पर्शाने कुत्रा जिवानिशी गेला. सुदैवाने आजूबाजूच्या रहिवाशांना काहीएक धोका पोहोचला नाही. विजेच्या समस्यांमुळे निर्माण झालेला सर्व त्रास वीज ग्राहक मुकाटपणे सहन करीत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विदगाव वीज उपकेंद्रातून ममुराबाद गावासाठी स्वतंत्र ११ केव्ही क्षमतेचा फिडर कार्यान्वित करावा त्याचप्रमाणे गावासाठी नेमून दिलेले लाईनमन मुख्यालयी वास्तव्यास राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्रस्त वीज ग्राहकांनी केली आहे.
-------------------
(कोट)...
ममुराबाद येथे बुधवारी रात्री वीज वाहक तार तुटून रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्या धक्क्याने कुत्र्याचा मृत्यू झाल्याबद्दल मला काहीच माहिती नव्हते.
- कल्पेश सपके, उपअभियंता, महावितरण
-----------------