आमडदे, ता.भडगाव : येथील शेतकरी धर्मराज तुकाराम भोसले, सागर धर्मराज भोसले, दिपक धर्मराज भोसले यांच्या शेतात वीज पडून आठ एकर ज्वारीचा चारा जळून खाक झाला. २५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.२५ रोजी आमडदे येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. मात्र धर्मराज तुकाराम भोसले यांच्या शेतात वीज पडून सुमारे आठ एकर ज्वारीचा चारा जळून खाक झाला. सुदैवाने जिवीत हानी टळली. शेतात राखण करणारे सुमारे तीन आदिवासी कुटुंब वास्तव्यास असून ते सुमारे २० जण यावेळी मुलाबाळांसह जीव मुठीत धरून घरात बसलेले होते. त्याचबरोबर गाई, म्हशी, बैलं अशी जनावरेही याच ठिकाणी होती. मात्र सुदैवाने सर्व बचावले. दरम्यान, मुक्या जनावरांसाठी चाराही साठवून ठेवला होता.या घटनेची माहिती सालगडीने दिपक भोसले यांना घटनेची माहिती देताच लागलीच भडगाव नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सुमारे तीन लाखाच्या आसपास चाऱ्याचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भडगाव न.पा.चे माजी नगराध्यक्ष श्यामकांत अशोक भोसले, नगरसेवक अमोल पाटील, डी. डी. पाटील,गावातील शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आदिवासी कुटूंबास धीर दिला तसेच तत्काळ गुरांची व्यवस्था दुसरीकडे केली. तर या जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न आता या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
आमडदे येथे वीज पडून चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 5:26 PM