महावितरण : ५० टक्के वीजबिल सवलतीची योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली असली तरी, वसुली मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या जळगाव परिमंडळातर्फे शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामावर बोलावून वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी दिली.
तसेच थकबाकीदार शेतकरी बांधवांना वीजबिलात ५० टक्के सवलत लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही शेख यांनी केले आहे.
कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या घरी जाऊन रिडिंग न घेता ग्राहकांना चार महिने सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेले वीजबिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी करून हे वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे सध्या खान्देशात १ हजार कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे थेट थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. पण, या कारवाईला नुकतीच स्थगिती देण्यात आल्यामुळे हजारो कोटींची थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणतर्फे मार्चपूर्वी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना पहिल्यांदाच विजबिलात ५० टक्के सवलत
कोरोना काळात महावितरणच्या विविध प्रकारच्या ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, यातील सर्वाधिक थकबाकी कृषीपंप वीज ग्राहकांकडे आहे. त्यामुळे ही वसुली होण्यासाठी महावितरणने ‘महाकृषी ऊर्जा अभियानां’तर्गत शेतकऱ्यांच्या वीजबिलावर ५० टक्के सवलत दिली आहे.
हे अभियान तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या थकबाकीवर ३० टक्के तर तिसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना २० टक्के सवलत मिळणार आहे. या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.