जळगाव- घराच्या कंपाउंडमधील मुख्य लोखंडी गेटमध्ये अचानक वीज प्रवाह उतरला अन् या गेटला स्पर्श होताच समतानगरातील मीराबाई अशोक पाटील (वय-५०) यांना विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़समता नगरात अशोक पाटील हे पत्नी मीराबाई यांच्यासह वास्तव्यास आहेत़ पाटील दाम्पत्यास गणेश आणि योगेश हे दोन मुले आहेत़ योगेश हा वलसाड येथे नोकरीला आहे तर गणेश हा विभक्त राहतो़ अशोक पाटील हे एका कंपनीत कामाला असून शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते कामाला निघून गेले होते़ त्यामुळे मीराबाई या एकट्याच होत्या़ दरम्यान, या भागामध्ये डीपी नसल्यामुळे सगळ्यांनी आकोडे टाकलेले आहेत़ त्यातील काही वायरी या मीराबाई यांच्या घरावरून गेल्या आहेत़ त्यामुळे कधी-कधी घरामध्ये विद्युत प्रवाह उतरतो़ शुक्रवारी सुध्दा अचानक अशोक पाटील यांच्या घराच्या कंपाउंडच्या मुख्य गेटमध्ये वीज प्रवाह उतरला़ सकाळी मीरबाई या घराबाहेर आल्यावर त्यांचा स्पर्श गेटला झाला़ आणि क्षणातच विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला़ मृत्यूनंतर मृतदेह त्यांचा गेटवरच पडून होता़अन् रहिवाश्यांनी घेतली धावलोखंडी गेडवरच मीराबाई या अडकून असून त्यांचा विजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याचे घराजवळील महिलेच्या लक्षात आले़ हा प्रकार त्वरित महिलेने रहिवाश्यांना सांगितला़ यावेळी सामाजिक कार्यकर्ता राजू बाविस्करसह रहिवाश्यांनी त्याठिकाणी धाव घेतली व मीराबाई यांना गेटच्या बाजू करण्याचा प्रयत्न केला़ याप्रसंगी दोन ते तीन जणांना किरकोळ विजेचा धक्का लागला़ त्यानंतर लाकडी दांड्याच्या सहाय्याने मीराबाई यांचा मृतदेह बाजूला करण्यात आला़
घराच्या कंपाउंडच्या गेटमध्ये उतरला वीज प्रवाह, स्पर्ध होताच महिलेचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 8:18 PM