जळगाव : गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयांना होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यात अनियमितता येत आहे. तसेच त्या पुरवठ्यात त्रुटी आहेत. त्यामुळे गुरुवारी आयएमएच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली आणि त्यांना या त्रुटी आणि अनियमितता दूर करण्याची मागणीदेखील केली.
या निवेदनात म्हटले की, रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे उपचार करताना समस्या वाढत आहेत. शासनाच्या मानकांप्रमाणे ऑक्सिजनचे पुरवठादार सिलिंडर भरून न देता कमी प्रमाणात आणि अतिशय कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा पुरवठादार जास्त दर आकारत आहेत. सिलिंडर रुग्णालयांना त्यांच्या खर्चाने आणावी लागत आहेत.
तसेच नॉन कोविड रुग्णालयातही नियमितपणे होणाऱ्या गंभीर रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी भूल देताना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते; परंतु आम्हाला त्यासाठी नियमितपणे सिलिंडर पुरवठा होत नाही आणि जो होतो तोसुद्धा कमी दाबाने भरलेल्या सिलिंडरचा आणि अवास्तव दराने आकारणी करून होतो आहे. या सर्व तक्रारी दूर करण्याची तसेच या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आयएमएच्या सदस्यांनी केली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. सी.जी. चौधरी, डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. दिलीप महाजन आणि इतर सदस्य उपस्थित होते.