काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित मू. जे. महाविद्यालयात घडलेली घटना संवेदनशून्य मानसिकतेचे प्रतिक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अल्पवयात हातात आलेली बाईक, मोबाईल आणि पैसा ते कसे वापरावे यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा अभाव अशी घटना घडण्यास पूरक ठरतात.आजच्या युवा पिढीला कोणाचाही धाक राहिलेला नाही. झुंडशाहीतून आपण काहीही करु शकतो, असा विश्वास दृढ झालेला पहावयास मिळतो. टिव्ही व सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तरूणाईकडून होत आहे , मोबाईल व इंटरनेटद्वारे उपलब्ध असलेल्या गेममधून संवेदनशीलता संपते. रेसमध्ये कशीही गाडी चालविली व अपघात झाला तरी पुन्हा गाडीवर स्वार होऊन गाडी चालविता येते. दुसऱ्याला मारुन जिंकण्याचा आसुरी आनंद बळावतो. बेफिकीरी, बेभानपणा व बेजबाबदारपणा यातून बळावतो. घरातील हरविलेला संवाद व मुलांची नकार न स्वीकारण्याची वृत्ती अशा घटनेच्या मुळाशी असु शकते. मुलांच्या चुकांना पाठीशी घालणे धोकादायक ठरते. मुलांना शिक्षाही करायची नाही, यामुळेही अशी वृत्ती वाढते. आपल्याला काय करायचे? ही समाजाची प्रवृत्ती याला खतपाणीच घालते. संस्कार व शिस्तीचा अभाव तसेच भोगवादीवृत्ती अशा घटनांसाठी कारणीभूत ठरतात. अशा घटनांच्या मुळाशी बेरोजगारी आहे असे वाटत नाही. जीवन का व कशासाठी याबाबतच्या मार्गदर्शनाचा अभावही महत्त्वाचा ठरतो.युवकांच्या प्रेरणादायी कथा समाजासमोर आणल्या जात नाही व नकारात्मक घटनांचे सर्वच माध्यमातून होणारे उदात्तीकरणही कारणीभूत ठरते.- गिरीश कुळकर्णी
संवेदनशून्य माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:26 PM