लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : येथील महावीर पतसंस्थेत कर्जदाराने कर्जाचा भरणा केला असूनही बाजारपेठ शाखा व्यवस्थापक, मुख्य शाखा व्यवस्थापक आणि मुख्य शाखेतील लिपिक यांनी स्वतःजवळ ती रक्कम ठेवून संस्थेची फसवणूक केली व अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये सप्टेंबर २०२०मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यातील महिला आरोपी सुरेखा सांखला या स्वत:हून मंगळवारी पोलिस ठाण्यात हजर झाल्या. त्यांच्यासह अन्य दोघांना १४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हा गुन्हा यावल रोड शाखेचे शाखा व्यवस्थापक अचल अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून तिघेही प्रमुख आरोपी त्यात महावीर पतपेढी येथील मुख्य शाखेच्या शाखा व्यवस्थापक सुरेखा सांखला, बाजारपेठ शाखेचे शाखा व्यवस्थापक नरेंद्र जैन आणि मुख्य शाखेतील लिपिक प्रवीण इंदरचंद जैन यांनी अमळनेर भाग न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर धाव घेतली होती. तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने त्यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने थेट सर्वोच्च न्यायालयात या तिघांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून धाव घेतलेली होती. तेथेही त्यांना मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याऐवजी येथून पुढे चार हप्त्यात तुम्ही स्वतःहून ज्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, त्या पोलिस स्टेशनमध्ये हजर व्हावे, असा आदेश दिल्याने तिसऱ्या मुख्य आरोपी व मुख्य शाखेच्या शाखा व्यवस्थापक सुरेखा सांखला या दिनांक ११ रोजी पोलिसांमध्ये स्वतःहून हजर झाल्या. दिनांक १० रोजी दोन आरोपींना अटक झाली होती आणि ११ रोजी सुरेखा सांखला यांच्यासह तीन आरोपींना चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश डी. जी. म्हस्के यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिघाही आरोपींना चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये सहायक पोलीस निरीक्षक अजित साळवे यांनी न्यायाधीशांसमोर हजर केले होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित साळवे हे करीत आहेत.
महिलेला चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवणार
साळवे यांना आपणाकडे अधिक माहिती उपलब्ध आहे काय, असे विचारले असता त्यांनी अजून तपासाला सुरुवात झाली नसून लवकरच तपासाला गती येईल असे सांगितले. या तीन आरोपींमध्ये सुरेखा सांखला आणि प्रवीण जैन हे दोघेही भाऊ-बहीण आहेत. सुरेखा सांखला यांना चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक साळवे यांनी कळविले आहे.