यावल : शहरात मंगळवारी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. येथील प्रसीद्ध महर्षी व्यास मंदिरात शहरवासीयांसह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणेच परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. येथील मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. पाच दाम्पत्यांच्या हस्ते महर्षी व्यास यांची महापूजा करण्यात आली.श्री महर्षी व्यास मंदिरात पहाटे येथील महेंद्र रामदास करांडे, विजय श्रीधर फालक, अॅडग़ोंविदा बारी, अडावदचे पीयूष बारी (अस्वार) हे सपत्नीक होते. धानोरा, ता.चोपडा येथील अलका पाटील यांना यावर्षी महापूजेचा मान मिळाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जळगाव, भुसावळ, रावेर, चोपडा तालुक्यांसह मध्यप्रदेशातील भाविकांनी महर्षी व्यासांचे दर्शन घेतले. भाविकांच्या आगमनाने शहरातील रस्ते गजबजून गेले होते.येथील जनार्दन स्वामी आश्रम, श्री साईबाबा मंदिर, दादाजी धुणीवाले दरबार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पारनेकर महाराज मंदिर येथेही गुरूपोर्णिमेचा उत्सव पार पडला. येथील बसस्थानकापासून ते मंदिरापर्यंत भुसावळचे माजी नगरसेवक अनिल चौधरी यांनी भाविकांना वाहनांची व्यवस्था केली होती.
महर्षी व्यासांच्या चरणी भाविक लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 9:40 PM