- कुंदन पाटीललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : उसनवारीने पैसे घेतले आणि फाटक्या मजूर बापाला सावकारी व्याजाने घेरले. व्याजही फुगत गेले आणि उसनवारीची परतफेड करणे अवघड झाले. तिथेच सावकाराला फावले आणि नाईलाजास्तव मजूर बापाने कर्जापोटी दोन्ही चिमुरड्या लेकरांना सावकाराच्या दावणीला बांधले. मातृत्व हरपलेले कोवळे हात मेंढ्या चारत गेले, तेव्हा ‘चाइल्ड लाइन’ चिमुरड्या भावंडांसाठी ‘माय’ बनून धावली आणि दोघांना नवे आयुष्य लाभले.
मुक्ताईनगरच्या दुर्गम पाड्यातील हा धक्कादायक प्रकार. १० आणि १२ वर्षांची ही भावंडे मजूर बापासोबत वास्तव्यास आहेत. मातृछत्र हरपलेल्या चिमुरड्यांच्या बापाने गाव सोडले. तत्पूर्वी पाड्यावरच्याच मेंढपाळ सावकाराकडून उसनवारीने पैसे घेतले आणि तो अन्य तालुक्यात मजुरी करू लागला. सावकाराने परतफेडीसाठी जहरी तगादा लावला. सावकाराची नजर दोघा भावंडांवर पडली. त्यांना त्याने सावकारी पाशात अडकवायला सुरुवात केली. बापाशी जुलमी सौदा केला. उसनवारीची रक्कम माफ केली आणि दोन्ही मुलांच्या मोबदल्यात २५ हजार रुपये दिले. दोन्ही मुले वर्षभर सावकाराकडे जंगलात राहून मेंढ्या चारतील, असा सौदा झाला. बापाने सावकाराच्या दावणीला मुले बांधली.
असा झाला उलगडाnदोन्ही पोरं राबू लागली. निरागस पाय रक्ताळत गेले. मेंढपाळ पाड्यावर आणि दोन्ही चिमुरडे रात्रंदिवस डोंगरावर, असा वेदनादायी प्रवास सुरू झाला. अशातच ग्रा.पं. सदस्य शोएब नूर मोहंमद पटेल यांना दोन्ही मुलांच्या रक्ताळलेल्या तळपायातले दु:ख दिसले. पटेल यांनी ‘चाइल्ड लाइन’ला माहिती दिली. त्यानंतर, हा प्रकार जळगावच्या बालकल्याण समितीला कळविण्यात आला.
सावकाराने धुडकावले, पथकावर केला हल्ला ‘चाइल्ड लाइन’चे पथक पोलिसांसोबत पाड्यावर पोहोचले. सावकाराकडे गेले. मात्र, सावकाराने धुडकावून लावले. पोलिसांना तो मुले माझ्याकडे नाहीत, असे सांगू लागला. पथकाच्या अंगावर कुत्रे सोडले. हाणामारीचाही प्रयत्न केला. शेवटी सावकाराने दोन्ही मुलांना या पथकाच्या ताब्यात दिले.
दोघांना पाठविले बालगृहात : दोघा बालकांना जळगावच्या बालकल्याण समितीसमोर आणण्यात आले. तेव्हा समितीने संगोपनासाठी दोघांना बालगृहात पाठविण्यात आले. या दोघा भावंडांनी आता शकुंतला विद्यालयात प्रवेश घेतला आहे.
‘चाइल्ड लाइन’च्या माध्यमातून बालकल्याण समितीने बालपणातले दु:ख पुसले आहे. दोघेही शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. - डॉ.वनिता सोनगत, महिला व बालविकास अधिकारी.