लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यावर उपाययोजना म्हणून मनपा प्रशासनातर्फे शहरात कोरोना रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून त्वरित निदान, त्वरित उपचारासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच शहरात कोरोना हॉट स्पॉट ठिकाणी कोविड-१९ अँटिजेन टेस्टवर अधिक भर देण्यात येत आहेत.
शहरात कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी मनपा हद्दीत मनपाच्या दहा हेल्थ सेंटरद्वारे कोविड-१९ रुग्णशोध मोहीम २६ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, चव येत नसेल, विशिष्ट पदार्थांचा वास येत नसेल अशा लक्षणांची विचारणा करण्यात येत आहेत. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कोरोना हॉटस्पॉट ठरणार्या परिसरात रुग्ण शोधमोहीम सुरू आहे. या मोहिमेसाठी त्या-त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक, मनपातील प्रभाग समिती अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभागातील डॉक्टर्स, आशा वकर्स यांची मदत होत आहे.
शनिवारी विविध भागांत अँटिजेन टेस्ट
मोहिम प्रमुख डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वकर्स आणि आरोग्य कर्मचार्यांनी शनिवारी शहरात शिव कॉलनी, जुने जळगाव, योगेश्वरनगर, गायत्रीनगर याठिकाणी सुमारे १३३पेक्षा अधिक जणांची कोविड -१९ अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यांना पुढील उपरासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
होम आयसोलेशनचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई
वाढती रुग्णसंख्या बघता होम आयसोलेशनसाठी (गृहविलगीकरण) मनपाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वतंत्र कक्षाद्वारे परवानगी देण्यात येत आहेत. मात्र, काहीजण अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परवानगी न घेताच परस्पर होम आयसोलेशन होत आहेत. तसेच होम आयसोलेशनमधील असलेले बाधित रुग्ण घराबाहेर फिरताना दिसून येत आहे. या प्रकारामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे निर्दशनास आले असून, अशा रुग्णांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
नागरिकांना सहकार्य करावे : आयुक्त
शहरात कोरोना रुग्ण शोधमोहीम गेल्या ३-४ दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक असून, ज्यांना लक्षणे वाटतात त्यांनी लगेच कोरोनाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. शोधमोहिमेला आलेल्या पथकाला माहिती न लपवता योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांंनी केले आहे.