जळगाव : बँक ऑफ बडोदाचे कर्जदार असलेले सुभाष काशीनाथ राणे (वय ६८, रा. लोंढे, ता.चाळीसगाव) या शेतकऱ्याकडून २० हजारांची लाच घेणारा प्रशांत विनायकराव साबळे (४२ रा. औरंगाबाद) हा बँकेचा कर्मचारी नसून वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीचा कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, साबळे याला गुरुवारी न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
बँक ऑफ बडोदाकडून ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज थकीत झाल्याने ट्रॅक्टर जप्तीची भीती दाखवून सुभाष काशीनाथ राणे (६८,रा. लोंढे, ता. चाळीसगाव) या शेतकऱ्याकडून साबळे याने २० हजारांची लाच घेतली होती. पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री त्याला अटक केली होती. दरम्यान, बुधवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली. गुरुवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. बँकेच्या अधिकृत सूत्रांशी संपर्क साधला असता साबळे हा बँकेचा अधिकारी नाही, थकबाकीदारांकडून वसुलीसाठी बँकेने एजन्सीला काम दिलेले आहे, त्या एजन्सीचा साबळे कर्मचारी असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.