लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विद्यापीठ कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासह पदनाम बदल प्रकरणात लेखापाल समितीसमोर बाजू मांडणा-या विद्यापीठ महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे नाव रद्द करण्यात यावे या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचा-यांनी तब्बल साडेसहा तास कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या दालनासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे, महासंघाच्या भ्रष्ट पदाधिकारीवर कारवाई झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेले होते.
विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाल सुरूवात झाली होती. या आंदोलनात उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव भैय्यासाहेब पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, दुर्योधन साळुंखे आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यापीठात साडे चारशे कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी १४ कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. ५७ कर्मचा-यांनी पदनाम बदल प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. उर्वरित कर्मचारी सातव्या वेतनापासून वंचित आहे. त्यांना तात्काळ सातवा वेतन लागू करण्यात यावा, अशी मागणी कर्मचा-यांकडून आंदोलनावेळी होत होती. दरम्यान, महाराष्ट्र विद्यापीठीय कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी रमेश शिंदे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी कृती समितीकडून होत होती.
६.१५ वाजता आंदोलन मागे
संपूर्ण दिवसभर कर्मचा-यांनी कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता. महिला कर्मचा-यांचाही समावेश होता. हे आंदोलन सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत चालले़ सायंकाळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेवून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवावा व पदनाम बदल प्रकरणात लेखापाल समितीसमोर रमेश शिंदे हे बाजू मांडणार आहेत, त्यांचे नाव रद्द करून दुस-या कर्मचा-याच्या नावाची निवड करावी, अशी मागणी केली. दरम्यान, चर्चेअंती शिंदे यांचे नाव रद्द करण्यात आले असल्याची माहिती कृती समितीचे भैय्यासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली़
गैरहजर राहूनही पूर्ण वेतन
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची ७ फेब्रुवारी रोजी मुदत संपली असून त्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी कृती समितीर्फे करण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी रमेश शिंदे हे गैरहजर राहून सुध्दा त्यांना पूर्ण वेतन अदा होते, असा आरोपही कृती समितीच्या पदाधिका-यांनी केला. तर सातवा वेतन आयोगाचा मुद्दा योग्य पध्दतीने मांडता न आल्याचाही ठपका कृती समितीने आंदोलनावेळी ठेवला.