लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आता १ मेपर्यंत कडक निर्बंध कायम करण्यात आले आहेत. या काळात व्यापार बंद असेल. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे रोजी तर गेली पण पोट भरायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच राज्य सरकारने शिवभोजन केंद्रांवर मोफत थाळीची घोषणा केल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्र आहेत. त्यातून ३,५०० थाळींचे वाटप केले जाते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यात कडक निर्बंध आणि संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेकांचा रोजगार बुडणार आहे. यामुळे त्यांची रोजी तर गेली पण रोटीचा प्रश्न कायम आहे. राज्य सरकारने या काळात शिव भोजन केंद्रांमधून मोफत थाळी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोज किमान ३,५०० लोकांच्या भुकेचा प्रश्न तरी मिटू शकतो. जिल्ह्यात जळगाव शहरासह सर्वच प्रमुख ठिकाणी ३८ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रांतून दररोज फक्त पाच रुपयात अनेकांची भूक भागते. जळगाव शहरातही जिल्हाधिकारी कार्यालय, चित्रा चौक परिसरात शिवभोजन केंद्र आहे. मात्र, बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी आहे.
३५०० लोकांची भागणार भूक
जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर ३,५०० जणांची भूक भागणार आहे. सरकारने ही योजना लागू करताना एका थाळीची किंमत १० रुपये ठेवली होती. त्यानंतर त्याच थाळीची किंमत सरकारने ५ रुपये केली. जानेवारी २०२१पासून या थाळीची किंमत पुन्हा १० रुपये करण्यात आली होती. मात्र, ३० मार्चपासून ही थाळी पाच रुपयातच दिली जात आहे.
थाळीचा लाभ घेणारे -
गेल्या काही महिन्यांपासून आम्ही नियमितपणे शिवभोजन थाळीचा लाभ घेतो. मात्र, आता शासनाने संचारबंदी केली आहे. त्यामुळे उद्यापासून घराबाहेर पडायचे तरी कसे, असा प्रश्न आहे. घराबाहेरच पडायचे नाही तर रोजगार गेला. ही मोफत थाळी खायला यायचे तरी कसे?
- अनिल जोहरे
संचारबंदीत बाहेर जेवणासाठी निघालो आणि त्याचवेळी पोलिसांनी अडवले तर काय करायचे. आधीच रोजगार गेला आहे. आता खायच्याही अडचणी होतील. - अनिल सोनवणे
गेल्या महिनाभरापासून रोजगार नाही. आता संचारबंदीने आणखी अडचण येईल. सरकारने मोफत जेवण दिले, पण ते घ्यायला जाताना पोलिसांनी अडवले तर काय करायचे.
- अजय धनगर
जिल्ह्यात असलेली शिवभोजन केंद्र
३८
केले जाणारे थाळीवाटप
३५००