पारोळा नगरीची ओळख झाशीच्या राणीचे माहेरघर अशी आहे़ येथे सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदताना दिसतो़ पूर्वीच्या काळी या भागात पाण्याचा गंभीर प्रश्न होता़ दुष्काळी स्थितीमुळे या भागातील महिलांचे जीवन सुकर नव्हते. पण ही समस्या जाणून येथील लोकनेतृत्वाने ती सोडविली. तसेच तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून घेऊन येथील महिला कौशल्याचा ठसा उमटवीत आहेत.तत्कालीन आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या दूरदृष्टीने व अथक प्रयत्नाने बोरी धरणाची निर्मिती झाली व पाण्याचा प्रश्न सुटला़ तसेच त्यांच्या शैक्षणिक सुधारणेच्या दृष्टीकोनातून किसान कॉलेजची निर्मिती झाली आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली़ त्यानंतर तंत्रशिक्षण महाविद्यालयाची निर्मिती झाल्याने महिलांसाठी रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वी पारोळयात बरेच हातमाग होते़ त्यामुळे खादी कपडे तयार करण्याचा रोजगार महिलांकडे होता. मात्र पुढे लघुउद्योकांना खीळ बसल्याने तो लोप पावला. तरीही येथील महिलांची कष्टाळू वृत्ती आजही कायम आहे. शेवया, पापड, कुरडया, लोणची आदी पदार्थ बनवून विक्री करण्याकडे कल वाढत गेला. त्यातून आज बचतगटामार्फत महिला उद्योजक तयार होत आहेत़ पूर्वीच्या अनिष्ट चालीरीतींना फाटा देत आजा महिला-मुली शिक्षणामुळे समाजविकासात हातभार लावताना दिसतात. भौतिक सुधारणा होऊन तसेच राहणीमान सुधारून महिला सर्व बाबतींत सुधारल्या असे म्हणता येणार नाही. खरी गरज ती वैचारिक सुधारणेची़ त्यासाठी ग्रमीण भागातील प्रत्येक मुलगी उच्चशिक्षित व्हावी, सुसंस्कृत व्हावी यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे.
-प्रा़ शुभांगी एन.मोहरीर,पारोळा